बेळगावात दोन वर्षानंतर होणारे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पाहण्याची शालेय विद्यार्थ्यांची संधी यंदा कोरोनाने हिरावून घेतली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा शालेय विद्यार्थ्यांना अधिवेशनाचे कामकाज पाहण्याची संधी आरोग्याच्या दृष्टिकोनातून न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विधान सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे -कागेरी यांनी गुरुवारी बेळगावात पत्रकारांना ही माहिती दिली.
बेळगावच्या सुवर्ण विधान सौध येथे येत्या 13 ते 24 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी विधान सभाध्यक्ष कागेरी यांनी आज बेळगावात अधिकार यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, दरवेळी अधिवेशनाचे कामकाज पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना परवानगी देण्यात येत होती. मात्र आरोग्याच्या दृष्टीने कोरोनामुळे यावेळी विद्यार्थ्यांना परवानगी देण्यात येणार नाही. केवळ मोठ्यांना अधिवेशन पाहता येईल. बेळगावमध्ये 2018 नंतर पुन्हा अधिवेशन घेण्यात येत आहे. यावेळीही अधिवेशन घेण्याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोरोनाचे संकट पुन्हा उभे ठाकले आहे.
आवश्यक सर्व तयारी करून सर्व खबरदारी घेत अधिवेशन घेतले जाईल. अवकाळी अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि जनता संकटात आहे. अधिकाऱ्यांवरही जबाबदारी वाढली असल्यामुळे ती पेलण्याचाही प्रश्न आहे.
त्याशिवाय विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. बेळगाव जिल्हा प्रशासनावरील जबाबदारी देखील वाढली आहे. निवास, भोजन आणि वाहतुकीशी संबंधित सर्व व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही विधानसभाध्यक्ष विश्वनाथ हेगडे -कागेरी यांनी दिली.
विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी दोन्ही सदनात विरोधी पक्षांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग न करता अधिवेशनाचे कामकाज यशस्वी कसे होईल हे पहावे. अधिवेशनात गोंधळ न घालता सकारात्मक चर्चेवर भर द्यावा असे सांगून विद्यमान विधान परिषद सदस्यांचा कालावधी 5 जानेवारी 2022 पर्यंत आहे. त्यामुळे त्यांनीही अधिवेशनात भाग घ्यावा, असे आवाहन होरट्टी यांनी केले. याप्रसंगी उपसभापती आनंद मामनी व अन्य नेते अधिकारी उपस्थित होते.