60 हजार फूट उंचीवर उणे 60 अंश तापमान असलेल्या सियाचीन रणभूमीत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक जवान शहीद होत आहेत हे लक्षात घेऊन त्या ठिकाणी ऑक्सीजन प्लांट उभारणीसाठी लोकवर्गणीतून तब्बल अडीच कोटी जमविणाऱ्या पुण्याच्या चिथडे दाम्पत्याला भेटण्याची संधी बेळगावकरांना उपलब्ध झाली आहे.
गुरुवर्य मो. ग. कुंटे स्मृति व्याख्यानमाले अंतर्गत येत्या रविवार दि. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता लोकमान्य रंगमंदिर येथे ‘सियाचीन ऑक्सिजन जनरेशन प्लांटची यशोगाथा’ सुमेधा व योगेश चिथडे उलगडणार आहेत.
तब्बल 60 हजार फूट उंचीवर उणे 60 अंश तापमान असलेल्या सियाचेन रणभूमीत भारतीय जवान शत्रूंच्या बंदुकीच्या गोळ्यांमुळे नव्हे तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शहीद होत आहेत हे लक्षात घेऊन पुण्याच्या सुमेधा व योगेश चिथडे यांनी तेथे ऑक्सीजन प्लांट उभारण्याचे ठरविले सुमेधा यांनी स्वतःचे दागिने विकून या कार्याचा शुभारंभ केला त्यानंतर लोकवर्गणीतून अडीच कोटी रुपयांचा हा ऑक्सीजन प्लांट सियाचिन येथे उभारण्यात आला.
चिथडे दांपत्याच्या या राष्ट्रभक्तीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी व लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी देखील घेतली आणि उभयतांची प्रत्यक्ष भेटून प्रशंसा केली. आता या दाम्पत्याने लष्कराबद्दल जनजागृती करण्याचा ध्यास घेतला आहे. सियाचीन येथील ऑक्सीजन प्लांटची थरारक रोमांचक यशोगाथा येत्या रविवारी सुमेधा व योगेश चिथडे हे उभयता सांगणार आहेत.
सरस्वती वाचनालय, वाङ्मय चर्चा मंडळ, वरेरकर नाट्य संघ, लोकमान्य ग्रंथालय व चित्पावन संघ या संस्थांच्या सहकार्याने कोरोना नियमांचे पालन करुन होत असलेला हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.