तीन महिन्यापूर्वी शहरानजीकच्या भुतरामनहट्टी झू अर्थात प्राणी संग्रहालयामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणलेल्या सिंह -सिंहिणीच्या जोडीतील ‘नकुल’ या सिंहाचे व्यवस्थित देखभाल न झाल्याने आजारपणामुळे निधन झाले आहे. नकुल हा सिंह काल बुधवारी रात्री पावसामध्ये मृतावस्थेत पडलेला आढळून आला.
या संग्रहालयातील ११ वर्षीय सिंहाचा गुरुवारी अल्पशा आजाराने मृत्यू झाला. नकुल नावाचा सिंह हा काही दिवसांपासून अस्वस्थ होता त्याला पचनाचा विकार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला .
सरकार आणि पशुप्रेमींकडून लाखो रुपयांचा निधी मिळत असतानाही भुतरामनहट्टी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना योग्य आहार आणि वैद्यकीय उपचार मिळत नसल्यामुळे तेथील प्राण्यांचा मृत्यू होत असल्याचे समजते.
यापूर्वी कांही पशुप्रेमींनी संग्रहालयातील प्राण्यांची हेळसांड होत असल्याचा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. तथापि अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या खेरीज प्राणिसंग्रहालयातील वाघांच्या पालनपोषणासाठी असलेल्या निधीतही भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला जात आहे.
प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाच्या बेजबाबदार कारभाराने नकुल या भारदस्त सिंहाचा बळी घेतला असल्याची प्रतिक्रिया पशू प्रेमी आणि परिसरातील नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
सिंहाच्या निधनाचे वृत्त समजताच वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राणी संग्रहालयाला भेट देऊन तपास कार्य हाती घेतले आहे. नकुल सिंहाच्या निधनाचे वृत्त समजताच त्याचा प्राणिसंग्रहालयातील रुबाबदार वावर पाहिलेल्या नागरिक व पशुप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.