मागील सहा महिन्यांपासून कृषी पत्तीन सोसायटी तर्फे कोणतेही कर्ज वाटण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुतगा कृषी पत्तीनं सोसायटीसमोर आंदोलन छेडले होते. तातडीने कर्जपुरवठा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. वारंवार सांगून देखील संबंधित कृषी पत्तीन सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी कर्ज वितरण केले नाही. यामुळे शेतकरी संतप्त झाले होते.
तालुक्यातील बहुतांश कृषी पत्तीन सोसायटीने कर्जपुरवठा केला आहे. मात्र मुतगा कृषी पत्ती सोसायटीने कर्ज पुरवठा केला नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी कृषी पत्तीन सोसायटीसमोर गावातील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले होते. यापूर्वी 59 लाख हुन अधिक कर्ज वितरणासाठी निधी मंजूर झाला होता. मात्र तो निधी वाटप करण्यात आला नाही. आताही चालढकल करण्यात येत आहे असा आरोप करत शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले होते.
दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी कर्ज वितरण करण्यासाठी अर्ज केले आहेत. मात्र एकाही शेतकऱ्याला आतापर्यंत कर्ज मिळाले नाही. याबाबत वारंवार तक्रार व विचारणा केल्यानंतर ही याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. परिणामी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कर्जपुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे.
याबाबत माजी तालुका पंचायत सदस्य व कृषी पत्तीन सोसायटीचे चेअरमन सुनील अष्टेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यापूर्वी कृषी सोसायटीला 59 लाख 50 हजार रुपये मंजूर झाले होते. शेतकऱ्यांनी वाढीव कर्ज मिळावे अशी मागणी करत जुने कर्ज घेतले नव्हते आता वाढीव सव्वा दोन कोटींच्या कर्जासाठी कागदपत्रे जमा केली जात आहेत आता ती वाढवून घेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
दोन कोटीहून अधिक रुपये मिळावे यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. चारशेहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तांत्रिक बाबीमुळे कर्ज देण्यास विलंब झाला आहे मात्र लवकरच सव्वा दोन कोटी कर्ज वितरण करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.