जारकीहोळी कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार लखन जारकीहोळी हे विधानपरिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहेत.
लखन जारकीहोळी समर्थक ग्रामपंचायतीचे हजारो समर्थक त्यादिवशी सकाळी बेळगाव येथील सरदार मैदानात दाखल होऊन उमेदवारी अर्ज सादर करताना आपले शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून महांतेश कवटगीमठ निवडणूक लढवत असून भाजपच्या नेत्यांनी लखन जारकीहोळी यांना भाजपचे दुसरे उमेदवार म्हणून ऑफर दिली आहे.मात्र त्यांनी पक्षविरहित उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे.आज बेंगळुरू येथील केपीसीसी कार्यालयात काँग्रेस उमेदवाराच्या निवडीबाबत एक प्रमुख बैठक होणार आहे.तेथे यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पक्षाचे ‘पॅकेट्स’ गळाला लागले त्या पक्षाचे वजन जास्त असेल.माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर भाजपचे उमेदवार महांतेश कवटगीमठ यांना विजयी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोंमाई यांच्याकडून मिळाली आहे.
लखन यांचे मोठे बंधू अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी कालच लखन यांना भाजपचा विधान परिषदेचा दुसरा उमेदवार करा अशी मागणी केली होती त्यामुळे भाजपचा लखन जारकीहोळी याना दुसरा उमेदवार करावा का याबाबत विचार सुरू होता मात्र लखन यांनी अपक्ष म्हणून आपण रिंगणात असल्याचे सूचित केलंय. एकुणच भाजप कडून कवटगीमठ तर कॉंग्रेस चन्नराज हट्टीहोळी तर अपक्ष म्हणून लखन जारकीहोळी अशी लढत झाल्यास निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे.