कर्नाटक सरकारच्या येत्या डिसेंबरमध्ये बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे एडीजीपी प्रताप रेड्डी यांनी आज सुवर्ण विधानसौध इमारतीला भेट देऊन पाहणी करण्याबरोबरच सुरक्षा व्यवस्थेबाबत स्थानिक पोलिस अधिकार्यांशी चर्चा केली.
सुवर्ण विधानसौध इमारतीतील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासह इमारतीचा आतील भाग आणि बाहेरील भागातील सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त, अधिवेशनाच्या अनुषंगाने होणारी आंदोलनं आणि निदर्शनांचे स्थळ आदी विविध बाबींसंदर्भात स्थानिक पोलिस अधिकार्यांशी एडीजीपी प्रताप रेड्डी यांनी चर्चा केली.
तसेच सुवर्ण विधानसौधच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात महत्त्वाच्या सूचना केल्या. याप्रसंगी उत्तर विभागाचे आयजीपी सतीश कुमार, शहर पोलीस आयुक्त डाॅ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी आदींसह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
डिसेंबर महिन्यात बेळगावात कर्नाटक विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. विधान परिषद निवडणूक संपल्यावर म्हणजे 20 डिसेंम्बर दरम्यान हे अधिवेशन व्हायची शक्यता असून अध्याप तारीख निश्चित झाली नाही मात्र राज्य सरकार च्या वतीनं अधिवेशनाची सगळी तयारी करण्यात येत आहे.