वड्डर छावणी, खासबाग येथील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाकीची नादुरुस्त झालेली मोटार एकीकरण समिती(मनसे)चे नवनिर्वाचित नगरसेवक रवी साळुंखे यांनी युद्धपातळीवर दुरुस्त करून दिल्याबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या प्रभाग क्र. 27 मधील वड्डर छावणी, खासबाग येथील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाकीला बसविण्यात आलेली मोटार गेल्या अनेक दिवसापासून नादुरुस्त झाली होती. त्यामुळे टाकीत पाणी चढवता येत नसल्यामुळे सदर पाण्याची टाकी कुचकामी झाली होती.
त्याप्रमाणे टाकीत पाणी नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. याबाबतच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन या प्रभागाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित नगरसेवक रवी साळुंखे यांनी आज शनिवारी नादुरुस्त झालेली पाण्याची मोटार समक्ष थांबून दुरुस्त करून घेतली.
मोटार दुरुस्त झाल्यामुळे आता पाण्याची समस्या दूर होणार असल्यामुळे वड्डर छावण्यातील रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त होत असून नगरसेवक साळुंखे यांच्याबद्दल प्रशंसोद्गार काढले जात आहेत.