आजादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ‘राष्ट्रीय एकता दिना’निमित्त बेळगावच्या एअरमन ट्रेनिंग स्कूलतर्फे आयोजित ‘एकात्मता दौड’ आज सकाळी अपूर्व उत्साह आणि जोशात पार पडली.
एअरमन ट्रेनिंग स्कूल बेळगावचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर एस. डी. मुकूल यांनी ध्वज दाखवून एकात्मता दौडला चालना दिली. सदर एकात्मता दौडमध्ये विविध वयोगटातील अधिकारी -एअरमन अशा 100 हून अधिक हवाई योध्यांनी भाग घेतला होता. या सर्वांनी देशाच्या एकता व अखंडतेचा संदेश देत 7.5 की. मी. अंतराची मिनी मॅरेथॉन अर्थात एकात्मता दौड अपूर्व उत्साह आणि जोशामध्ये धावून पूर्ण केली. दौड दरम्यान सर्वांनी स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या तंदुरुस्त आरोग्याचा संदेशही पसरविला.
भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा केला जातो. यंदाचे वर्ष मागील सर्व वर्षांच्या तुलनेत अत्यंत खास आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण यंदा आपला देश स्वातंत्र्याचे 75 व्या वर्ष आझादीका अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्यामुळे एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या एकात्मता दौडला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. दौंडच्या समाप्तीनंतर एअर कमोडोर मुकुल यांच्या हस्ते यशस्वी धावपटूंना पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच मॅरेथॉन यशस्वी केल्याबद्दल आयोजक समितीच्या सदस्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना एअर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर एस. डी. मुकुल यांनी देशाचे स्वातंत्र्य ही स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्याला दिलेली अमूल्य भेट आहे. आजादी का अमृत महोत्सव हा त्या स्वातंत्र्य सैनिक आणि स्वातंत्र्य लढ्याला दिलेला सन्मान आहे.
आपण सर्वांना शारीरिक तंदुरुस्ती आणि संघटित राहण्यासाठी कायम प्रेरित करत राहिले पाहिजे असे सांगून आपण सर्वांनी देशाप्रती आपले कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे सांगितले. याप्रसंगी निमंत्रित पाहुणे यांसह हवाई दलाचे अधिकारी, प्रशिक्षणार्थी एअरमन्स आणि कर्मचारी उपस्थित होते.