Tuesday, November 19, 2024

/

दर पावसाळ्यात ‘या’ रस्त्याची होते ‘हीच’ दुर्दशा

 belgaum

बेळगाव शहराला झोडपलेल्या पावसामुळे अस्वच्छ गटार आणि ड्रेनेज तुंबून ओव्हरफ्लो झाल्याने बी. एस येडियुरप्पा मार्गावर आज दुपारी पुन्हा प्रचंड प्रमाणात सांडपाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

शहरात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नावे प्रशस्त रस्ता बांधण्यात आला आहे तथापि मुख्यमंत्र्यांचे नाव दिलेले असतानाही या रस्त्याकडे बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड आणि महापालिकेचे साफ दुर्लक्ष झालेले आहे.

या रस्त्या शेजारील गटारी आणि ड्रेनेजची वेळोवेळी साफसफाई केली जात नसल्यामुळे गेल्या कांही वर्षापासून दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर साचून सदर रस्त्याचे पार दुरावस्था होत असते. यासंदर्भात वेळोवेळी तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत असते.Yedurappa road

जोरदार मुसळधार पावसामुळे दरवेळी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सांडपाण्याची मोठी तळी साचण्याचा प्रकार घडतो. मैला, केरकचरा -घाणयुक्त सांडपाण्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण होते. त्याचप्रमाणे पाणी ओसरल्यानंतर या रस्त्यावर सर्वत्र घाण व केरकचरा पसरलेला असतो.

परिणामी दुर्गंधीमुळे या रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागते. खुद्द मुख्यमंत्र्यांचे नाव दिलेल्या रस्त्याकडे महापालिका आणि स्मार्ट सिटी लिमिटेडचे साफ दुर्लक्ष होत असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच येथील गटारी आणि ड्रेनेजची वेळच्यावेळी साफसफाई करून बी. एस. येडियुरप्पा यांचे नामकरण केलेल्या या प्रशस्त रस्त्याचे सौंदर्य अबाधित राखावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.