आपण जर वारसा सांगत असेन तर गल्लीपासून सर्वच ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे. हीच नाथ पैना खरी श्रद्धांजली असेल.नाथ पै यांचे विचार चिरंतन राहतील यासाठी प्रयत्नशील राहूया.असे आवाहन व्याख्याते आनंद मेणसे यांनी केले.
कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ठ वकील राम आपटे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते द्वीपप्रज्वलीत करून झाले त्यानंतर बॅ नाथ पै यांच्या प्रतिमेस प्रा आनंद मेणसे यांनी पुष्पहार अर्पण केला.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष राम आपटे, मध्यवर्ती म ए समितीचे अध्यक्ष दीपक दळवी,कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, व्याख्याते प्रा आंनद मेणसे, नवनिर्वाचित नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रवी साळुंखे, वैशाली भातकांडे आणि सरचिटणीस मालोजी अष्टेकर उपस्थित होते.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रवी साळुंखे, वैशाली भातकांडे यांचा राम आपटे यांच्याहस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
यानंतर आनंद मेणसे यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात केली. नाथ पै यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा, गोवा मुक्ती संग्राम साराबंदी लढा अशा अनेक लढ्यामध्ये सहभागी होऊन अनेकदा तुरुंगवास भोगला होता.लोकशाहीवर विश्वास असणारा नेता ही त्यांची ओळख होती असे सांगून त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा आढावा घेतला.
समाजवादी चळवळीने भारतातील संसदीय लोकशाहीला बहुमोल योगदान दिले आहे. त्यात महत्त्वाचे नाव म्हणजे बॅ. नाथ पै.ते कोकणातुन प्रथम लोकसभेवर गेले.जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान असताना या तरुण खासदाराची विविध प्रश्नांवरची मते विचारपूर्वक ऐकून घेत. प्रत्येक भारतीयाने राष्ट्र सेवा दलात सामील व्हावं अशी त्यांची इच्छा होती.
17 जानेवारी ला हुतात्म्यांना अभिवादन करण्यास येण्याचे वचन दिले असल्याने तब्येत बरी नसताना सुध्दा ते आले आणि सभेला उद्देशून भाषण केलं पण 18 तारखेला पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
नाथ पै यांचा जन्म वेंगुर्ल्याचा असला तरी त्यांचे बालपण आणि शिक्षण बेळगावात झाले. तिथे त्यांनी राष्ट्रीय चळवळीचे आणि देशप्रेमाचे बाळकडू मिळाले.नाथ पै लोकशाहीवादी होते. अश्या शब्दात आनंद मेणसे यांनी नाथ पै यांचा जीवन परिचय दिला.