आर्ट्स सर्कलने आयोजित केलेला ‘दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम रविवार दि.३१ ऑक्टोबर रोजी आर पी डी कॉलेजच्या सभागृहामध्ये रसिकांच्या बहुसंख्य उपस्थितीत उत्साहात पार पडला. पूर्णिमा भट कुलकर्णी ह्यांच्या गायनाच्या कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
दिवाळी निमित्त दरवर्षी साजरा होणारा हा कार्यक्रम हे रसिकांसाठी एक आकर्षण असते. आसावरी भोकरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली व्यासपीठाची सजावट हा देखील कार्यक्रमाचा एक आकर्षक भाग असतो.
प्रारंभी रोहिणी गणपुले ह्यांनी कलाकारांचे आणि रसिकांचे स्वागत केले.कार्यक्रमाची सुरुवात पूर्णिमा भट कुलकर्णी ह्यांनी ललत ह्या प्रातःकालीन रागाने केली. विलंबित ख़्याल एकतालात आणि द्रुत बंदिश तीनतालात त्यांनी सादर केली. त्यानंतर थोडासा अप्रचलित असा राग देवगांधार त्यांनी सादर केला. मध्यंतरापूर्वी त्यांनी एक मराठी भजन सादर केले.
मध्यंतरानंतर पूर्णिमा ह्यांनी राग अल्हैय्या बिलावल सादर केला. विलंबित आणि द्रुत बंदिश तीनतालात होती त्याशिवाय त्यांनी एक तराना पेश केला. त्यानंतर ठुमरी, एक वचन आणि भैरवी गाऊन त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
त्यांच्या गायनाला बेळगांवातील नामवंत कलाकार अंगद देसाई आणि रवींद्र माने ह्यांनी उत्कृष्ट अशी तबला आणि संवादिनी साथ केली. रसिकांनी सर्वच कलाकारांना भरभरून दाद दिली.रोहिणी गणपुले ह्यांनी कलाकारांचा परिचय करून दिला आणि सर्वांचे आभार मानले.