बेळगाव सीमाप्रश्नी महाजन अहवाल हाच अंतिम आहे हे आपल्याला माहीत आहे. यापुढे या विषयावर कोणत्याही प्रकारची चर्चा कोणत्या प्रकारचे ठराव आणि कोणत्याही प्रकारची विधाने आपल्याला माहिती नाही .त्यामुळे सीमाप्रश्न संदर्भात महाजन अहवाल अंतिम हेच ध्यानात घ्या असे बेळगावचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बेळगाव महानगरपालिकेवर भाजपचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले या संदर्भात तसेच इतर विषयांवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी म ए समितीच्या पराभवानंतर महाराष्ट्रात उमटलेले पडसाद, सामनाचा अग्रलेख आणि बेळगावात भाजपने सीमाप्रश्नाचा ठराव करावा या झालेल्या मागणीवर ते बोलत होते. शांतता भंग करणे हे त्या लोकांचे काम आहे. त्यांना किंमत द्यायची नाही आम्ही त्यांना कवडीचीही किंमत देत नाही .
कर्नाटकाची एक इंच भूमी आम्ही देणार नाही आणि एक थेंब पाणी आम्ही देणार नाही असे उद्गार गोविंद कारजोळ यांनी काढले. बेळगावात भाजपचे नगरसेवक जास्तीत जास्त संख्येने निवडून आल्यानंतर महाराष्ट्रात भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी आनंदोत्सव साजरा केला .
आता फक्त बेळगाव झाले मुंबई बाकी आहे. मुंबई महानगरपालिकेवर ही भाजपची सत्ता येईल. असे विधान काही भाजपच्या नेत्यांनी केल्यानंतर सामना आणि संजय राऊत यांनी त्यांचा समाचार घेतला .
भाजप भगव्याला मानत असेल तर त्यांनी बेळगावात बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासंदर्भातील ठराव महानगरपालिकेत मांडून दाखवावा. अशी प्रतिक्रिया उमटली. त्यावरून कर्नाटकात विरोधाचे वारे निर्माण झाले असून या संदर्भात पत्रकारांनी गोविंद कारजोळ यांना छेडले असता त्यांनी असे उत्तर दिले आहे.