कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि राज्यात अद्याप आटोक्यात न आलेली दुसरी लाट अशा प्रतिकूल परिस्थितीत महापालिका निवडणूक घेणे म्हणजे कोरोना संसर्गाचा धोका वाढीस निमंत्रण दिल्यासारखे होणार आहे. तेंव्हा जाहीर केलेल्या महापालिका निवडणुका तात्काळ रद्द करून पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी सिटिझन्स कौन्सिल बेळगावने एका निवेदनाद्वारे राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.
नागरिक आणि समाजाच्या इतर रक्षणार्थ कार्य करणाऱ्या सिटिझन्स कौन्सिलच्या सदस्यांनी आज सकाळी सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन निवडणूक आयुक्तांना धाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवेदनाचा स्वीकार करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. आपल्याला माहीतच आहे की सध्या आपल्या राज्यासह संपूर्ण देश अत्यंत धोकादायक महामारीचा सामना करत आहे.
या कोरोना महामारीला नेस्तनाबुत करण्यासाठी नागरिक आणि सरकार प्रशासन यांनी एकजुटीने प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने गेल्या दीड -दोन वर्षात अत्यावश्यक असणारा लाॅक डाऊन अनेक टप्प्यात राबविल्यानंतर आता कोठे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तथापि कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही.
आता कोरोनाची येणारी संभाव्य तिसरी लाट लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक धोकादायक असल्यामुळे आपल्याला खबरदारीच्या मार्गदर्शक सूचीनुसार त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे. सध्या भारतात कोणत्याही प्रकारची निवडणूक घेणे म्हणजे ती गर्दी करणारी पर्यायाने कोरोना संसर्ग वाढीस निमंत्रण देणारी ठरणार आहे.
या प्रतिकूल परिस्थितीत महापालिका निवडणुका निश्चितपणे कोरोनाचा धोका आणखी वाढविणाऱ्या ठरू शकतात. तरी याचा गांभीर्याने विचार करून जाहीर केलेल्या महापालिका निवडणुका तात्काळ रद्द करून पुढे ढकलण्यात याव्यात, अशा आशयाचा तपशील मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवेदनात नमूद आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी सतीश तेंडुलकर यांच्यासह ॲड. एन. आर. लातूर, शेवंतीलाल शाह, विकास कलघटगी आदी सिटीझन्स कौन्सिल बेळगावचे सदस्य उपस्थित होते.