Monday, April 29, 2024

/

महाविद्यालयीन प्रवेश : ‘या’ विद्यार्थ्यांची समस्या येणार ऐरणीवर

 belgaum

राज्यातील एसएसएलसीचा निकाल जाहीर होताच बेळगावातील पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची एकच गर्दी होत आहे. यंदा 100 टक्के निकालामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळविले असल्याने त्यांचीच नांवे प्राधान्याने महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवणार्‍या विद्यार्थ्यांच्या यादीत असणार असल्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांनी जायचे कोठे? ही समस्या ऐरणीवर येऊ लागली आहे.

एसएसएलसीचा निकाल जाहीर होताच शहरातील नामांकित पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालक वर्गात एकच चढाओढ लागली आहे. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांचे कार्यालय आवार विद्यार्थी व पालकांनी फुलून गेलेले पहावयास मिळत आहे. सध्या महाविद्यालयांकडून प्रवेश अर्ज दिले जात असून सरकारकडून आदेश मिळताच पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे परीक्षा रीतसर व्यवस्थित घेता न आल्यामुळे यंदा एसएसएलसीच्या 100 टक्के निकाल लावून सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले आहे.

परिणामी टक्केवारीत मोठी वाढ झाल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास देखील वाढला आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी विज्ञान आणि वाणिज्य (सायन्स -कॉमर्स) अभ्यासक्रमाला प्राधान्य देताना दिसत आहेत.

 belgaum

यापूर्वी सहसा 48, 50, 60 टक्के या मर्यादेत निकाल लागायचा. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेप्रसंगी पदवीपूर्व महाविद्यालयांवर ताण पडत नव्हता. कारण संबंधित महाविद्यालयांनी टक्केवारीच्या ठरविलेल्या निकषानुसार तेवढेच विद्यार्थी प्रवेशासाठी येत होते. मात्र यावेळी मुलांची टक्केवारी लक्षात घेता बहुतांश मुलांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. या पद्धतीने 90 पेक्षा जास्त टक्केवारी असेल आणि शंभर टक्के निकाल असेल तर ते 70 -80 टक्के गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अडचणीचे ठरणार आहे. ही मोठी समस्या शिक्षण संस्थांसमोर उभी ठाकली आहे.

सध्या विविध महाविद्यालयात जाऊन विद्यार्थी व पालक 25 -50 रुपये देऊन फक्त प्रॉस्पेक्टससह प्रवेश अर्ज घेत आहेत. मात्र प्रवेश अर्ज दाखल केल्यानंतर ज्यावेळी महाविद्यालयांची प्रवेश गुणवत्ता यादी लावण्यात येईल, तेंव्हा त्या यादीत 90 टक्क्यावरील विद्यार्थ्यांचीच नांवे असणार आहेत. असे झाले तर उर्वरित 70 -80 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी जायचे कोठे? हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.

दरम्यान, बारावीचा निकाल जाहीर होऊन 15 दिवस उलटले असले तरी अद्याप राज्य सरकारने पदवीपूर्व प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी आदेश दिलेले नाहीत. या वर्षी नव्याने तयार करण्यात आलेल्या एकत्रित विद्यापीठ आणि महाविद्यालय व्यवस्थापन प्रणालीद्वारे प्रवेश देण्यात येणार आहे.

दहावीचा निकाल जाहीर होताच पदवीपूर्व कॉलेजच्या प्रवेश अर्जांचे वितरण सुरू झाले असल्यामुळे विद्यार्थी व त्यांचे पालक सध्या संबंधित महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रिया केंव्हा सुरू होणार याची चौकशी करताना दिसत आहेत. तथापी प्रत्येक महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक प्रवेश अर्ज वितरित करण्यात आल्याने प्रवेश प्रक्रिया किचकट होण्याबरोबरच 90 टक्के पेक्षा कमी गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा भवितव्याचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.