कर्नाटकातील विमान उड्डाण पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी आपण जातीने लक्ष घालावे, अशी लेखी विनंती केंद्रीय नागरी विमान उड्डाण खात्याचे मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना केली आहे.
देशातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) येत्या चार-पाच वर्षात 20 हजार कोटी खर्चून देशातील विमानतळांचा विकास आणि विस्तार करण्याच्या कामाला आरंभ केला आहे.
त्या अनुषंगाने कर्नाटकातील विमान उड्डाण क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. तथापि त्यामध्ये कांही समस्या येत असून त्या समस्यांकडे केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे लक्ष वेधले आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या प्रकल्पासाठी बेळगाव विमानतळाच्या ठिकाणी 370 एकर जमिनीची गरज आहे. तथापि आत्तापर्यंत फक्त 348.6 एकर जमीन हस्तांतरीत करण्यात आली आहे. त्याप्रमाणे म्हैसूर विमानतळाच्या ठिकाणी एएआयने 240 एकर जमिनीची मागणी केली आहे.
मात्र राज्य सरकारकडून ती जमीन अद्याप हस्तांतरित करण्यात आलेली नाही. कर्नाटक सरकारने शिमोगा आणि विजयपुरा येथील विमानतळ कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलावीत जेणेकरून आरसीएस उडान 4.1 योजनेअंतर्गत त्यांचा विचार करता येईल, याकडे केंद्रीय नागरी विमान उड्डाण खात्याचे मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.