कर्नाटक राज्यात सध्या नेतृत्व बदलाची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केलेला दिल्ली दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. या दिल्ली दौर्यात मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.
गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर बोलताना कर्नाटकात नेतृत्व बदलाचा सध्या प्रश्न नाही. राज्यातील नेतृत्वावर भाजप हायकमांडचा पूर्ण विश्वास आहे, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा राज्यात भाजपच सत्तेवर येणार आहे, तेंव्हा कामाला लागा असा सल्ला आपल्याला देण्यात आला असल्याचेही येडियुराप्पा यांनी सांगितले.
कर्नाटकातील नेतृत्वावर केंद्रातील नेतृत्वाचा विश्वास असून पुन्हा एकदा राज्यात भाजप सत्तेवर येईल असा विश्वास हायकमांडला आहे. कर्नाटकात भाजपला चांगले भविष्य असल्यामुळे पक्षसंघटना वाढवून भाजपला अधिक बळकट करण्याद्वारे भाजपला पुन्हा एकवार सत्तेवर आणा, अशी सुचना आपल्याला देण्यात आली आहे.
केंद्र सरकारचा कर्नाटकातील सर्व योजनांना पाठिंबा आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार आवश्यक ती सर्व मदत देण्यास तयार आहे, असे आश्वासन केंद्रातील नेतृत्वाने आपल्याला दिले असल्याचेही मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपच विजय होऊन सत्तेवर येईल असे केंद्रातील नेतृत्वाने म्हटले असल्याचे त्यांनी सांगितले.