मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सूचना दिल्यास 21 जून सोमवारपासूनच कोरोना नियमांचे पालन करून परिवहन बस सेवा सुरू केली जाईल, असे राज्याचे परिवहन मंत्री असणारे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सांगितले.
कोरोना प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यातील परिवहन सेवा बंद ठेवण्यात आली आहे. येत्या 21 जूनपासून राज्यातील लाॅक डाऊन हटविण्यास संदर्भात राज्य सरकार विचार करत आहे.
या संदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी सुचना दिल्यास 21 जून सोमवारपासूनच कोरोना मार्गदर्शक सूचीचे पालन करून परिवहन बस सेवा सुरू केली जाईल. सध्या राज्यात प्रायोगिक तत्त्वावर 50 टक्के बस सेवा सुरू करण्याबाबत विचार केला जात आहे.
मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत सध्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रारंभी मर्यादित स्वरूपात प्रवासी वाहतूक सुरू होईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यात वाढ केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी स्पष्ट केले.
एकंदर गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्या आता पुनश्च रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज झाले आहेत. तथापि मुख्यमंत्री यासंदर्भात काय निर्णय घेतात हे पहावे लागणार आहे.