कर्नाटक राज्यातील 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला शनिवार दि. 22 मे 2021 पासून प्रारंभ होत असून सुरूवातीस सर्वप्रथम मान्यताप्राप्त कोरोना फ्रन्टलाइन वॉरियर्सचे लसीकरण केले जाणार आहे.
सदर लसीकरण मोहिमेचे जिल्हा पातळीवरील इन्चार्ज जिल्हाधिकारी असणार असून बेंगलोर महानगरात महापालिका आयुक्त इन्चार्ज असतील. वर्क प्लेस व्हॅक्सिनेशन या पद्धतीने हे लसीकरण केले जाणार आहे.
कोवीशिल्ड लसीकरणासाठी जिल्हाधिकारी प्रत्येक श्रेणीसाठी नोडल अधिकारी नियुक्त करतील. ज्या श्रेणीखाली लसीकरण केले जाणार आहे, त्यासाठीचे पात्रता प्रमाणपत्र नोडल अधिकाऱ्यांकडून अदा केले जाईल. लसीकरण करून घेण्यासाठी हे पात्रता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे.
कोवीन पोर्टलवर नांव नोंदणीसाठी भारत सरकारचे मान्यताप्राप्त कोणतेही ओळखपत्र सादर करावे लागणार आहे. लसीकरणाच्या स्थळांची संख्या आणि प्रतिदिन किती जणांना लस द्यायची याचा आकडा जिल्ह्यातील लसीच्या साठ्यानुसार निश्चित केला जाणार आहे.
राज्यातील सर्व कोरोना फ्रन्टलाइन वॉरियर्सचे लसीकरण झाल्यानंतर यादीतील प्राधान्यानुसार इतर लाभार्थींचे लसीकरण केले जाणार आहे.