कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या संकटमय परिस्थितीचा गैरफायदा घेताना बेळगावातील कांही खाजगी हॉस्पिटल चालकांनी आपले उखळ पांढरे करून घेताना लाखाच्या पटीत बीलं आकारून खुलेआम गरीब सर्वसामान्य जनतेची लूट चालवली असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कित्तुर चन्नम्मा नजीक असलेल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये गेल्या 9 मेपासून उपचारासाठी दाखल झालेल्या एका रुग्णाचे आठ दिवसाचे म्हणजे 17 मे पर्यंतचे हॉस्पिटलचे बिल 2,66,000 रु. इतके काढण्यात आले आहे. त्यामध्ये जनरल वॉर्ड तीन दिवसाचे भाडे प्रतिदिन 12,000 रुपये प्रमाणे एकूण 36,000 रुपये, स्पेशल रूमचे भाडे 18,000 रुपये प्रतिदिन प्रमाणे सहा दिवसांचे भाडे 1,08,000 रुपये आदी खर्चांचा समावेश आहे.
कायदेशीर कारवाईतून सहीसलामत सुटका यावे यासाठी रुग्णाच्या नातलगांकडे एका कच्च्या कागदावर GW -12000×3 =36000, S/P Room -18000×6 =10800, prof -5000×9 =45000, Asst.Doc. -4000×9 =36000, Nurse -3000×9 =27000, Juf -500×16 =8000, Oxygen -3000×2 =6000 या पद्धतीने एकूण 2,66,000 खर्च दाखविणारे बिल देण्यात आले आहे.
ज्या रुग्णाच्या नांवाने हे बिल काढण्यात आले आहे, त्या रुग्णाची आईदेखील सध्या सदर हॉस्पिटलमध्ये दाखल असून वडिलांचे चार दिवसांपूर्वी निधन झाले आहे. हॉस्पिटलच्या या अव्वाच्या सव्वा बिलामुळे संबंधित रुग्णाच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकटच कोसळले आहे.
या पद्धतीने शहरातील बहुतांश खाजगी हॉस्पिटल्समध्ये बेसुमार बिले आकारून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. गरिबांचे महाबळेश्वर म्हंटल्या जाणाऱ्या बेळगावातील सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने सध्याचा हॉस्पिटलचा खर्च आवाक्याबाहेरील आहे.
तरी जिल्हाधिकाऱ्यांसह आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन खाजगी हॉस्पिटल्सकडून नागरिकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.