महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्बंध लादले असली तरी या काळात मनोरंजनाला ब्रेक लागू नये यासाठी सर्वच टीव्ही वाहिन्यांकडून खबरदारी घेतली जात आहे. शो मस्ट गो ऑन… असे म्हणत झी मराठी वाहिनीवरील दैनंदिन मालिकेचं शूट आता महाराष्ट्राबाहेर होणार आहे. त्यापैकी देव माणूस मालिकेचे चित्रीकरण बेळगावला केले जात आहे.
साताऱ्यातील वाड्यात होणाऱ्या “देव माणूस” मालिकेचे शूटिंग आता बेळगावात होत आहे. चांगुलपणाचा बुरखा घालून घात करणाऱ्या वृत्तीवर भाष्य करणारी देव माणूस ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. या मालिकेच्या पुढच्या भागाचे चित्रीकरण बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे केले जात आहे. सदर मालिकेच्या निर्मात्या श्वेता शिंदे यांनी फोटो शेअर करून याची माहिती दिली आहे.
गेल्या वर्षी लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वाला मोठा फटका बसला होता. मालिकांचे चित्रीकरण मार्च ते जुलै असे जवळपास चार महिने बंद होते. त्यामुळे प्रेक्षकांना जुन्या भागांचा आस्वाद घ्यावा लागत होता.
यावेळी याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी दरम्यानच्या काळातच अनेक निर्मात्यांनी एपिसोड्सची बँक तयार करून ठेवली होती. सध्या महाराष्ट्रातील चित्रीकरण थांबताच बहुतांश हिंदी मालिकांनी आपलं बस्तान राज्याबाहेर हलवलं आहे.
मराठी मालिकांसाठी हा पर्याय खर्चिक असला तरी अखंड मनोरंजनाची हमी देण्यासाठी अनेक वाहिन्यांनी शो मस्ट गो ऑन असे म्हणत पोटाला चिमटा काढत तो पर्याय स्वीकारला आहे.