शनिवार दिनांक २४ एप्रिलपासून काही मोजकी न्यायालये वगळता इतर न्यायालयांना उन्हाळी सुट्टी पडणार आहे. कोरोनामुळे यापूर्वीही बराच काळ न्यायालयीन कामकाज ठप्प होते. जवळपास महिनाभर न्यायालयांचे कामकाज पूर्णपणे बंद राहणार असून २४ मे रोजी पुन्हा न्यायालये सुरु होणार आहेत.
काही मोजकी न्यायालये वगळता इतर न्यायालयांचे कामकाज बंद राहील. मात्र कोरोनामुळे २४ मे नंतरदेखील न्यायालयीन कामकाज सुरु होणार की नाही, हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून राहील.
काही मोजकीच न्यायालये सुट्टीकाळात सुरु राहणार असून या न्यायालयात काही प्रमाणात कामे होणार आहेत. अत्यंत महत्वाचे तसेच गुन्हेगारी खटल्यांचे कामकाज होणार आहे. जेएमएफसी आणि एकच जिल्हा न्यायालय या काळात सुरु ठेवण्यात येणार आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून अनेक खटले प्रलंबित होते. त्यानंतर चार महिन्यांपूर्वी कामकाजाला सुरुवात झाली. पण कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा न्यायालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.
यामुळे पक्षकारांनाही पुन्हा न्यायाच्या प्रतीक्षेत थांबावे लागणार आहे. एकंदरीत परिस्थितीमुळे आधीच अडचणीत असलेल्या वकिलांनाही याचा फटका बसणार आहे.