बेळगाव महापालिकेसमोर उभारण्यात आलेल्या लाल-पिवळ्या ध्वजा संदर्भात येत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल किंवा तोडगा काढला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिले आहे.
बेळगाव महापालिकेसमोर उभारण्यात आलेला राष्ट्रध्वजाचा अवमान करणारा बेकायदेशीर लाल -पिवळा ध्वज तात्काळ हटवावा या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आज सकाळी मराठी भाषिकांचा भव्य मोर्चा काढण्यात आला.
सदर मोर्चाद्वारे सादर करण्यात आलेले निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपरोक्त आश्वासन दिले. मी तुमच्या भावनांचा आदर करतो असे सांगून जिल्हाधिकारी हिरेमठ म्हणाले की, आता राज्य सरकारचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे त्या ध्वजासंदर्भातील निर्णय सध्या घेता येणार नाही. हा तांत्रिक मुद्दा असल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब झाला आहे. तथापि अधिवेशन संपल्यानंतर या मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लाल-पिवळ्या ध्वजाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल किंवा योग्य तोडगा काढला जाईल, असे स्पष्ट करून यासंदर्भात कन्नड संघटनांशी देखील चर्चा सुरू आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावर आक्षेप घेऊन उपस्थित कार्यकर्त्यांनी यामध्ये कन्नड संघटनांचा काय संबंध? असा सवाल केला. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा तेंव्हा घ्या मात्र तोपर्यंत आम्ही देखील महापालिकेसमोर भगवा फडकवणार असे सांगितले.
बेकायदेशीर लाल-पिवळ्या ध्वजासंदर्भात निर्णय घेण्यास प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याबद्दल कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाच्या या वेळकाढू धोरणामुळे तीव्र नाराज झालेले उपस्थित कार्यकर्ते भगव्याबाबत आग्रही झाले होते. यावेळी अध्यक्ष दीपक दळवी यांच्यासह समितीच्या नेतेमंडळींनी संतप्त कार्यकर्त्यांना शांत करून सबुरीचा सल्ला दिला. त्याचप्रमाणे जोपर्यंत महापालिकेसमोर भगवा फडकणार नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन देखील थांबणार नाही असा स्पष्ट इशारा देखील प्रशासनाला दिला.