Wednesday, January 29, 2025

/

बालेकिल्ल्यात ठराव मांडणारच!

 belgaum

सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून परिचित असलेल्या येळ्ळूर ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत स्थापनेपासून ते यंदा झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचेच वर्चस्व आहे. ग्रामपंचायत स्थापनेपासून ते आजतागायत सभागृह अस्तित्वात आल्यानंतर सीमाप्रश्नी ठराव मांडण्यात येतो. परंतु यंदा मात्र ठरावाची परंपरा खंडित झाली असून सीमावासीयांमधून या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्याशी ‘बेळगाव लाईव्ह’ ने संपर्क साधला असता, पुढील बैठकीत नक्कीच ठराव मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मध्यवर्ती आणि गावकरी समितीशी चर्चा करून, सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेला पूरक होईल, असा ठराव मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काळात होणाऱ्या बैठकीत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, गावकरी आणि वकीलांशी चर्चा करून समन्वय साधून योग्य असा ठराव मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामपंचायतअध्यक्ष निवडणुकीनंतर ‘बेळगाव लाईव्ह’ ने त्यांच्याशी संपर्क साधला असता, परंपरेला फाटा देण्यात येणार नसून, परंपरेप्रमाणे पहिल्या बैठकीत सीमाप्रश्नी ठराव मांडला जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. पहिल्या बैठकीत ठराव मांडण्यात येईल, या विश्वासाने सीमावासीयांचे लक्ष येळ्ळूर ग्रामपंचायतीकडे होते. मात्र अचानक या या गोष्टीला फाटा देण्यात आल्याने मराठी भाषिकातून नाराजीचा सूर उमटत आहे.

 belgaum

यावेळी ग्रामपंचायतचे माजी उपाध्यक्ष  येळ्ळूर समितीचे कार्याध्यक्ष  दुधप्पा बागेवाडी यांच्याशी ‘बेळगाव लाईव्ह’ने संपर्क साधला असता, सीमाप्रश्नी पुढील बैठकीत ठराव मांडण्यात येणारच असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सीमाप्रश्न हा महत्वाचा मुद्दा असून या ठरावाला रद्द करण्यात आले नसून पुढील बैठकीत नक्की ठराव मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.Mes yellur gp

सभागृह अस्तित्वात आल्यानंतर झालेल्या येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीत सर्वप्रथम नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. पीडीओ अरुण नाईक यांच्यामार्फत हा ठराव मांडण्यात आला. त्यानंतर गावच्या विकासासंदर्भात ठराव मांडण्यात आला. याचसोबत गावातील लक्ष्मी गदग परिसराची स्वच्छता करण्यासंदर्भात ठराव मांडण्यात आला. परंतु सीमाप्रश्नाच्या ठरावाचा विसर नवनिर्वाचित समितीच्या ग्रामपंचायत सदस्यांना पडलेला दिसून आला.

येळ्ळूरमध्ये समितीच्या नावावर निवडणूक लढविणार उमेदवार हे केवळ आणि केवळ समितीच्या नावावरच निवडून येतात. महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार म्हणूनच मतदार भरघोस मतांनी निवडूनही देतात. सीमाप्रश्नी येळ्ळूर गाव नेहमीच अग्रेसर राहिले आहे. येळ्ळूरच्या ग्रामपंचायतीवर नेहमीच समितीची सत्ता प्रस्थापित करण्यामागे सीमाभाग महाराष्ट्रात सामील करण्याचाच अजेंडा असतो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या परंपरेला बगल देण्यात आल्यामुळे गावकरी तसेच संपूर्ण सीमाभागात मराठी भाषिकातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पहिल्या बैठकीत तर सीमाप्रश्नाच्या ठरावाला बगल देण्यात आली आहे. परंतु दुसऱ्या बैठकीत सीमाप्रश्नी नक्कीच ठराव मांडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली असून, सीमावासियांच्या लक्ष आता दुसऱ्या बैठकीकडे लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.