आपण ज्या मैदानावर खेळतो ते मैदान स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक क्रीडापटूचे कर्तव्य असले तरी कांही मोजक्या क्रीडापटुंना त्याची जाणीव असते. अशाच क्रीडापटूंपैकी एक आहेत आंतरराष्ट्रीय ॲथलिट शितल कोल्हापुरे.
ज्यांनी आज सायंकाळी आपल्या शिष्यांच्या मदतीने टिळकवाडी येथील सुभाष चंद्र बोस मैदान अर्थात लेले मैदानावरील प्रेक्षक गॅलरीची स्वच्छता केली.
लेले मैदानावर बांधकाम झाल्यापासून सदर प्रेक्षक गॅलरीच्या स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे या गॅलरीच्या पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणात पालापाचोळा कचऱ्याच्या स्वरूपात जमा झाला होता.
आंतरराष्ट्रीय ॲथलिट शितल कोल्हापुरे आणि त्यांच्या शिष्यांनी रोजच्या सरावातून वेळ काढून आज सायंकाळी या प्रेक्षक गॅलरीची झाडलोट केली. त्यामुळे बकाल स्वरूप प्राप्त झालेली प्रेक्षक गॅलरी पुन्हा स्वच्छ झाली.
या आदर्शवत उपक्रमाचे मैदानावर फिरण्यास आणि खेळण्यास येणाऱ्यांकडून कौतुक होत होते. तसेच हा आदर्श इतर खेळाडूंनी देखील घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.