नियमाचे उल्लंघन करून बैलगाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट ऊस भरण्याद्वारे बैलांवर जे कौर्य केले जाते, त्यांचे जे हाल केले जातात त्याच्या विरोधात भाजप नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या आणि कर्नाटक पशु कल्याण मंडळाच्या सदस्य डाॅ. सोनाली सरनोबत यांनी आवाज उठविला आहे.
उसाच्या वाहतुकीसाठी बैलांचा वापर करून त्यांचे जे हाल केले जातात त्याच्याविरोधात डॉ. सरनोबत यांनी राज्याचे पशुपालन आणि मत्स्य पालन खात्याचे मंत्री प्रभू चौहाण यांच्यासह जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार केली असून यासंदर्भात तात्काळ कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे. साखर कारखान्यांकडे ऊस घेऊन जाण्यासाठी बैलगाड्यांचा वापर करणे ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य बाब आहे. त्याचप्रमाणे सर्वसाधारणपणे पाच ते आठ टन उसाची बैलगाडीतून वाहतूक केली जाते. मात्र अलीकडे बैलगाडीतून जास्तीत जास्त ऊस घेऊन जाण्याची की जणू स्पर्धा सुरू झाली आहे.
साखर कारखान्यांकडून देखील अशा स्पर्धांना प्रोत्साहन दिले जाते. जास्तीत जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बैलगाड्यांसाठी बक्षीसाचे आम्ही दाखविले जाते. त्यामुळे बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या जीवाची पर्वा न करता गाडीत खच्चून ऊस भरला जातो. परिणामी त्या मुक्या जनावराला जबरदस्तीने क्षमतेपेक्षा दुप्पट वजनाच्या उसाचे वजन वाहावे लागते.
सातत्याने मोठ्या प्रमाणात ऊस भरलेल्या बैलगाडीचे ओझे वहावे लागल्यामुळे बैलांचे गुडघे, मान आणि खांद्याला सूज येते. तसेच कामाच्या ताणामुळे त्यांची शरीरातील प्रतिकार क्षमता देखील कमी होऊन ते अल्पायुषी होतात. ऊसाने खच्चून भरलेल्या अवजड बैलगाड्या महत्प्रयासाने ओढत नेणारे बैल आपण नेहमीच पाहत असतो.
उसाचे अधिक कमी म्हणून की काय बैलगाडीवर दोघे -तिघे जण बसलेले असतात. परिणामी बिचारे बैल मोठ्या कष्टाने धापा टाकत तोंडाला फेस येईपर्यंत बैलगाड्या वाढताना दिसून येतात. नियमानुसार बैलगाडीत 1.5 ते 2.5 टन ऊस ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये 12 ते 14 ट्रकमध्ये 14 ते 16 हार्वेस्टर ट्रॉलीमध्ये 12 ते 14 टन ऊस भरावा लागतो.
मात्र प्रत्यक्षात याचे सर्रास उल्लंघन केले जाते. बैलगाडीत सुमारे 3 ते 4 टनापेक्षा जास्त ऊस भरला जातो आणि बिचाऱ्या बैलांचे हाल होतात. याची गांभीर्याने दखल घेऊन डॉ. सोनाली सरनोबत यांनी आता या गैरप्रकाराच्या विरोधात आवाज उठविला आहे.