ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात होणार असून पहिल्या टप्प्यातील होणाऱ्या ग्रामपंचायतींची अर्ज भरण्याची तारिख ७ डिसेंबर हि आहे तर दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीची अर्ज भरण्याची तारीख ११ डिसेंबर आहे. बेळगावमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पंचायत निवडणुकीसंदर्भात माहिती दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिसुचनेनुसार अर्ज भरणा प्रक्रियेला सुरुवात होणार असून अर्ज पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत अर्ज भरण्याची अंतिम तारीख ११ डिसेंबर असून दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १६ डिसेंबर ही असणार आहे.
या अर्जाची छाननी अनुक्रमे १२ डिसेंबर आणि १७ डिसेंबर रोजी करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख १४ डिसेंबर ही असेल तर दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १९ डिसेंबर असेल. 22 आणि 27डिसेंबर अशा दोन टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीचे निकाल ३० डिसेंबर रोजी घोषित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संबंधित तालुक्यांमध्ये ३० डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. निवडणूक काळात कोणत्याही अनुचित प्रकार घडला, तर जनतेने जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या कंट्रोल रूमशी अथवा अबकारी खात्याच्या कंट्रोल रूमशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.