संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक रणधुमाळी सुरु झाली असून दोन टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी इच्छुकांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. सोमवार दि. ७ डिसेंबर पासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असून यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरु झाली आहे.
या निवडणुकीत एका उमेदवाराला चार अर्ज दाखल करण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिली असून अनामत रक्कम भरून चार अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्वीकारण्यात येणार आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी खुल्या गटातून २०० रुपये तर अनुसूचित जाती-जमाती, महिला, आर्थिक मागास या वर्गासाठी केवळ १०० रुपये अनामत रक्कम अर्जासोबत भरावी लागणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी आवश्यक कागपत्रे –
* प्रपत्र ५ मध्ये उमेदवारी अर्ज
* जातीचे प्रमाणपत्र
* प्रतिज्ञापत्र (ऍफिडेव्हिट), २० रुपये किमतीचे, दोन प्रति (झेरॉक्स कॉपीसह)
* मतपत्रिकीत नमूद करावयाच्या नावाबाबत लिखित तपशील
* उमेदवाराने निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करावी लागणारी अधिक माहिती (प्रोफाइल इन्फॉर्मशन)
* ग्रामपंचायतीचे थकबाकी संदर्भातील नाहरकत प्रमाणपत्र
* पासपोर्ट आकारातील तीन छायाचित्रे
* मतदान ओळखपत्र / आधार कार्डच्या झेरॉक्स प्रति
राज्य निवडणूक आयोगाने ही निवडणूक लढविण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची माहिती जाहीर केली असून त्यानुसार तहसील कार्यालयातून प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरु झाली आहे. अपूर्ण माहिती आणि कागदपत्रे पुरवून अर्ज बाद होऊ नये यासाठी निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी खबरदारी घेण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक माहितीसाठी वकील तसेच संबंधित मार्गदर्शकांकडून सल्ला घेण्यात येत आहे.
निवडणुकीबाबतची सर्व माहिती, अर्ज हे केवळ कन्नड भाषेत असल्याने मराठी भाषिकांना अडचणीचे ठरत आहे. बेळगावं खानापूर, निपाणी, चिकोडी, हुक्केरी परिसरातील मराठी भाषिकांची माहितीअभावी मोठी अडचण होत आहे. माहितीपत्रकात देण्यात आलेल्या कन्नड भाषेतील माहितीमुळे अर्ज भरण्यासाठी आणि कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी मराठी भाषिकांची तारांबळ उडत आहे. यासाठी मराठी उमेदवारांकडून मराठी भाषेत कागदपत्रे पुरविण्याची मागणी करण्यात येत आहे.
या निवडणुकीत निम्म्या जागा या महिलांसाठी राखीव आहेत. यासोबतच अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास वर्गासाठी जागा राखीव आहेत. या उमेदवारांना अर्ज दाखल करताना अधिक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहेत. यामध्ये जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला यांचा समावेश आहे.