आगामी बेळगांव लोकसभा पोट निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून माजी मंत्री व केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांच्या नांवाची चर्चा आहे. उमेदवार निवडी संदर्भात सोमवारी बेंगलोर येथे पार पडलेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत बहुतांश नेत्यांनी आमदार जारकीहोळी यांच्या नांवाची शिफारस केली आहे.
बेंगलोर येथे झालेल्या बैठकीप्रसंगी आमदार सतीश जारकीहोळी यांना उमेदवारी दिल्यास बेळगांव जिल्ह्यात काँग्रेसला बळ मिळणार असल्याचे सांगण्यात आले. तथापि आमदार जारकीहोळी यांनी मात्र विचार करून निर्णय कळवतो, असे बैठकीत सांगितले आहे. उमेदवार निवडीसाठी राज्य काँग्रेसची ही दुसरी बैठक असून पहिली बैठक बेळगांवमध्ये झाली होती. काँग्रेसने उमेदवार निवडीसाठी माजी मंत्री एम. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली 11 सदस्यीय निवड समिती स्थापन केली आहे. बेंगलोरमधील या समितीच्या बैठकीत बेळगांव ग्रामीणच्या आमदार हेब्बाळकर यांच्या नांवाचीही चर्चा झाली.
बैठकीस विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्य काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार,डाॅ. जी ईश्वरप्पा, ईश्वर खंडरे, आमदार महांतेश कौजलगी आदी उपस्थित होते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि बेळगांवचे खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्ष्यांचा आपापल्या उमेदवारांबाबत अद्याप निर्णय झालेला नसला तरी त्या अनुषंगाने जोरदार तयारी मात्र सुरू आहे.
दरम्यान आमदार सतीश जारकीहोळी यांनीच बेळगांव लोकसभा पोटनिवडणूक लढवावी, अशी सूचना बहुदा काँग्रेस हायकमांडकडून येण्याची शक्यता आहे.