रेस्टॉरंट चालकाच्या हुशारीमुळे फोनवर आर्मी ऑफिसर असल्याची बतावणी करून पैसे लुबाडण्याचा एका अज्ञात भामट्या महिलेचा प्रयत्न फसल्याची घटना नुकतीच घडली आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि स्लीम फीट डायट फूड या रेस्टॉरंटचे मालक गौरांग गेंजी यांच्या बाबतीत हा प्रकार नुकताच घडला आहे. फोनवरून आर्मी ऑफिसर असल्याची बतावणी करणाऱ्या एका महिलेने प्रथम गेंजी यांच्याकडे 20 जणांच्या जेवणाची ऑर्डर नोंदविली. या जेवणाच्या ऑर्डरचे बिल 3 हजार रुपये होत असल्याचे गौरांग यांनी त्या महिलेला सांगितले. तेंव्हा त्या महिलेने आपला माणूस पैसे देऊन जेवण घेऊन जाईल असे सांगितले.
त्यानंतर काही वेळाने त्या महिलेने जेवण तयार आहे का? अशी विचारणा केली. त्यावेळी गेंजी यांनी तिला जेवण तयार असल्याचे सांगितले. तेंव्हा तिने माणसाकडून पैसे पाठवून देण्याऐवजी तुमच्या अकाउंटवर पैसे जमा करते. तुमचे बँक अकाउंट डिटेल द्या, असे सांगितले. तेंव्हा गेंजी यांनी पैसे गुगल पे करा असे सांगितले. आर्मीच्या पद्धतीत ते बसत नाही असे सांगून संबंधित महिलेने तुमच्या एटीएम कार्डचा फोटो काढून पाठवून द्या, असे गौरांग गेंजी यांना सांगितले.
तेंव्हा हा फसवणुकीचा प्रकार असण्याची शक्यता लक्षात घेऊन सावध झालेल्या गेंजी यांनी झिरो बॅलन्स असलेल्या आपल्या अन्य एका अकाउंटच्या एटीएम कार्डचा फोटो त्या महिलेला पाठवला. मात्र त्यानंतर त्या महिलेचा परत फोन देखील आला नाही किंवा पार्सल घेण्यासाठी माणूस देखील आला नाही. तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिचा फोन आणि व्हाट्सअप ब्लॉक झाला होता.
तेंव्हा आपली लुबाडणूक करण्याचा हा प्रयत्न होता हे गौरांगी गेंजी यांच्या लक्षात आले. स्वतःच्या बाबतीत घडलेला हा प्रकार लक्षात घेऊन कोणत्याही अनोळखी माणसांना आपले बँक अकाउंट डिटेल्स देऊ नका, असे आवाहन गौरंगी गेंजी यांनी केले आहे.