प्रधान मंत्री मुद्रा योजनेनंतर्गत वितरण करण्यात येणाऱ्या कर्जाच्या संख्येत कर्नाटकात बेळगाव जिल्हा अव्वल असल्याचा अहवाल प्रकाशित झाला आहे. मुद्रा योजनेंतर्गत कर्नाटक राज्यात जास्त प्रमाणात कर्ज वितरण करण्यात आले असून जिल्हानिहाय यादीत बेळगावचे नाव अग्रभागी आहे. १८ सप्टेंबर पर्यंत या योजनेंतर्गत ६,९०६.१२ कोटी रुपयांचे कर्जवितरण या आर्थिक वर्षात करण्यात आले आहे.
या योजनेतील सर्वाधिक लाभार्थी हे बेळगाव जिल्ह्यातील असून ७७,९८९ जनांपर्यंत ही योजना पोहोचली आहे, असे वृत्त ‘द हिंदू’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. अनेक राष्ट्रीयीकृत बँकांच्या साहाय्याने हे कर्जवितरण करण्यात आले असून एकूण ९,७५,८७३ लाभार्थींनी या योजनेंतर्गत कर्ज घेतले आहे.
ही योजना प्रधानमंत्र्यांनी ८ एप्रिल २०१५ साली जाहीर केली होती. या योजनेंतर्गत १० लाखांपर्यंतचे कर्ज बिगर कॉर्पोरेट, बिगर-शेती लघु / सूक्ष्म उद्योगांना उपलब्ध करून देण्यात येत होते. प्रधान मंत्री मुद्रा योजनेच्या अंतर्गत ‘मुद्रा’ या स्वरूपात या कर्जाचे वर्गीकरण करण्यात येते. हे कर्ज वितरण कमर्शियल बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, लघु वित्तीय बँक, नॉन बँकिंग फायनान्स कंपनी यांच्या माध्यमातून केले जाते. ज्या कर्जदारांना या योजनेच्या माध्यमातून हे कर्ज घ्यायचे असेल ते या वरील बँकेच्या माध्यमातून घेऊन शकतात. किंवा www.udyamimitra.in या ऑनलाईन पोर्टल वर जाऊन रजिस्टर करू शकतात. या योजनेच्या अंतर्गत शिशु, किशोर आणि तरुण अशा तीन विभागात कर्ज वितरण केले जाते. नवोदित उद्योजकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.