Monday, May 13, 2024

/

मातृशक्तीचा सृजन उत्सव रणरागिणी : माधुरी जाधव

 belgaum

मातृत्वासोबत कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी समाजातील नवदुर्गा ‘बेळगाव लाईव्ह’ च्या माध्यमातून प्रकाशझोतात आणत आहोत. नवदुर्गा.. ज्यांनी स्त्री-पुरुष या भेदापलीकडे जाऊन पुरुषाच्या बरोबरीने अनेक क्षेत्रात पुढाकार घेतला आहे.. अशा नवदुर्गांची कहाणी आपण पाहणार आहोत.. आज नवरात्रीची पहिली माळ.. यानिमित्ताने समाजातील अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या आणि बेधडकपणे मृतदेह उचलून शववाहिका चालविणाऱ्या माधुरी जाधव यांच्याशी केलेली बातचीत…

उंबरठ्याच्या आतच राहणारी स्त्री आता सातासमुद्रापलीकडे गेली आहे. पाणी, जमिन ते थेट वाऱ्यासोबत उंच झेपावणाऱ्या अनेक महिला आज विविध क्षेत्रात धडाक्यात कार्य करीत आहेत. बेळगावसारख्या ठिकाणीही अनेक महिला विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे माधुरी स्वप्नील जाधव.

अलीकडेच कोरोनासारख्या भयानक रोगाने संपूर्ण जगात हाहाकार माजविला. याकाळात कोरोना वॉरियर्स म्हणून अनेकांनी पुढाकार घेतला. परंतु बघता बघता कोरोना रुग्णांची संख्या इतकी वाढू लागली की, रुग्णांना सेवा मिळणे कठीण झाले. अशाकाळात धाडसाने एक पाऊल पुढे टाकून बेळगावच्या माधुरी जाधव यांनी पुढाकार घेतला. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कामावर त्यांनी अल्पावधीतच हातखंडा मिळविला आणि त्यांच्या कार्याने संपूर्ण बेळगावकरांचे लक्ष वेधले गेले. कोरोनाच्या धास्तीने अनेक रुग्णवाहिका चालकांना थोडा विचार जरूर करावा लागला असेल परंतु माधुरी जाधव यांनी रुग्णांच्या सेवेसाठी तत्परतेने शववाहिकेचे स्टेअरिंग आपल्या हाती घेतले.

 belgaum

माधुरी स्वप्नील जाधव या मूळच्या बेळगावच्याच आहेत. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या माधुरी जाधव यांनी वडगाव येथील स्वप्नील जाधव यांच्याशी विवाह केला. सुरुवातीपासूनच समाजकार्याची आवड असणाऱ्या माधुरी ताईंना नेहमीच वडिलांचा पाठिंबा मिळत गेला. समाजसेवक सुरेंद्र अनगोळकर यांच्या ‘हेल्प फॉर नीडी’ या संस्थेत त्या कार्यरत असून त्यांच्या समाजसेवेला इथूनच सुरुवात झाली. सुरेंद्र अनगोळकर यांच्या अनुपस्थितीत रुग्णवाहिकेची अत्यंत गरज होती. यादरम्यान कोणीही उपलब्ध नसल्याने माधुरी जाधव यांनी हे धाडस केले.Madhuri jadhav

मृतदेह म्हटलं की अनेक लोक पाय मागे खेचतात. परंतु मृतदेह उचलण्यापासून ते शववाहिकेत नेण्यापर्यंत आणि शववाहिका थेट स्मशानापर्यंत पोहोचवण्यापर्यंत आणि अंत्यसंस्कारासाठी कोणीही उपलब्ध नसेल तर अंत्यसंस्काराचीही जबाबदारी माधुरी जाधव लीलया पेलतात. रुग्ण कोविड संसर्गित असो किंवा इतर सामान्य आजाराने बाधित असो मदतीसाठी त्या नेहमीच पुढाकार घेतात. ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना त्यांनी एक किस्सा सांगितला. बस्तवाड येथे एक मृतदेह आणण्यासाठी हेल्प फॉर नीडीचे सदस्य गेले होते. त्यादरम्यान मृतदेह शववाहिकेत घालण्याकरिता उपस्थित असलेल्या अनेकांना त्यांनी मदतीसाठी आवाहन केले. परंतु उपस्थितांनी मृतदेह हलविण्यास नकार दिला. यावेळी सुरेंद्र अनगोळकर आणि माधुरी जाधव यांनी निश्चय केला की, यापुढे अशा परिस्थितीत आपणच मृतदेह उचलायचा. या प्रसंगामुळे त्यांना या कामाबद्दल धाडस निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.Madhuri jadhav

आज अनेक ठिकाणी माणुसकी हरवत चालल्याचे चित्र पहावयास मिळते. कोणत्याही प्रसंगात अडचणीत असलेल्या गरजूंना मदत करण्यासाठी पुढे सरसावताना ती व्यक्ती आपल्याच कुटुंबाचा एक भाग आहे, अशा समजुतीने आपण मदतीसाठी पुढाकार घ्यावा. मदत करताना कोणताही संकोच न बाळगता जमेल तितकी मदत आपण करावी. माणुसकी जपावी. या कामाचा मोबदला आपल्याला मिळत नाही पण मदत केल्याचे समाधान मिळते.

यापुढील काळातही आपल्याकडून असेच कार्य होत राहील. शिवाय प्रत्येक महिलेने आजच्या स्पर्धात्मक युगात कोणतीही भीती न बाळगता आपल्या आवडीच्या क्षेत्रात नक्कीच पुढे यावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

माधुरी जाधव यांच्या कार्याला ‘बेळगाव लाईव्ह’ चा सलाम. आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा !

-(वसुधा कानूरकर सांबरेकर )

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.