गोवावेस येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने यंदा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यावर्षी नागरिकांकडून मिळणाऱ्या वर्गणीद्वारे गणेशोत्सव साजरा न करता स्वतः घरगुती गणेश मूर्तींची विक्री करून त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत केली जाणार आहे.
यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असून कोरोना आणि लॉक डाऊनमुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती खालावली असल्यामुळे गोवावेस येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी या मंडळाचे हे 26 वे वर्ष आहे. दरवर्षी आकर्षक देखावे सादर करणारे गणेशोत्सव मंडळ म्हणून या मंडळाचा नावलौकिक आहे.
यंदा या मंडळाने एकूण 150 घरगुती गणेश मूर्ती आणल्या आहेत. बेळगावमधील स्थानिक मूर्तिकार बरोबर कोल्हापूर येथूनही कांही मूर्ती आणल्या आहेत. नागरिकांसाठी माफक दरामध्ये या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध असतील. या मूर्तींच्या विक्रीतून मिळणारी रक्कम पंतप्रधान सहाय्यता निधी, अनाथाश्रम आणि परिसरातील गरीब मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप यासाठी खर्च केली जाणार आहे. त्याचप्रमाणे देणगी न मूर्ती विक्रीच्या पैशातूनच यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.