Saturday, April 27, 2024

/

कौतुकास्पद..बेळगावतलं हे मंडळ करणार दीड दिवसाचा गणपती

 belgaum

गेल्या 73 वर्षात नाविन्यपूर्ण देखावे व भव्य श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना करीत आलेल्या हुतात्मा चौक श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अतिशय साध्या पद्धतीने केवळ 2 फूट उंचीच्या श्री मूर्तीची प्रतिष्ठापना करून दीड दिवसाचा सार्वजनिक सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

हुतात्मा चौक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची बैठक ॲड. अशोक पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत येत्या श्री गणेश उत्सवाप्रसंगी केवळ 2 फुटाच्या श्री मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याबरोबरच कोणत्याही धार्मिक विधींना फाटा न देता नीटनेटकेपणाने दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्याचप्रमाणे श्री मूर्तीच्या आगमन आणि विसर्जन या दोन्ही मिरवणुकींना यंदा फाटा देण्यात येणार आहे.

हुतात्मा चौक, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली व कडोलकर गल्ली येथील व्यापारी मंडळींनी एकत्रित येऊन सन 1947 साली हुतात्मा चौकातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. गेल्या 1997 साली या मंडळाने आपला सुवर्णमहोत्सव साजरा केला.

 belgaum
Hutatma chouk ganesh mandal
Hutatma chouk ganesh mandal

यंदा कोरोना संक्रमणाच्या संकटावर मात करण्यासाठी मंडळाकडून घेण्यात येणार्‍या दक्षतेअंतर्गत श्री मूर्तीची प्रतिष्ठापना रामदेव गल्ली येथील श्रीराम मंदिरात करण्यात येणार आहे. यावेळी कोणत्याही धार्मिक विधींना फाटा न देता सोशल डिस्टंसिंगचे पालन करून दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यादरम्यान कोरोना संदर्भातील खबरदारी आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

यावर्षी वर्गणी गोळा न करता स्वखुशीने श्री भक्तांकडून देण्यात येणाऱ्या देणगीचा स्वीकार केला जाणार आहे. गणेशोत्सव काळातील अनावश्‍यक खर्चाला आळा घालण्यासाठी विद्युतरोषणाईमध्ये देखील कपात केली जाणार आहे. उत्सव काळात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात असल्यास आरोग्य शिबिरास अन्य समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले.

प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष ॲड. अशोक पोतदार यांनी प्रास्ताविक केले. सेक्रेटरी शिवाजी हंडे यांनी ठरावांची घोषणा केली. याप्रसंगी राजकुमार कलघटगी, अमोल बेंद्रे, जुगलकिशोर जोशी, शेखर हंडे, श्याम सुतार, विजय मोहिते, सुभाष कांबळे, तानाजी भेकणे, गोपाल पुरोहीत, यशराज हंडे, ओमप्रकाश राजगुरु, हेमंत सूर्यवंशी आदी उपस्थित होते. शेवटी रामकुमार जोशी यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.