Friday, March 29, 2024

/

ऑक्टोबरपर्यंत तरी शाळांचा विचार नको : सिटीझन्स कौन्सिलची मागणी

 belgaum

प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे नूतन शैक्षणिक वर्ष ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलावे. त्यानंतर यदाकदाचित जर शाळा सुरू झाल्या तर शाळेत दर आठवड्याला मुलांच्या तपासणीचे शिबिर घ्यावे. शाळेतील मुलांना प्रतिकारशक्ती वाढवणारे औषध द्यावे. प्रत्येक शाळांचे निर्जंतुकीकरण सक्तीचे करावे. शाळांमधील स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण याची पाहणी करण्यासाठी टास्क फोर्स समितीची स्थापना करावी, अशा मागण्या बेळगावच्या सिटिझन्स कौन्सिल फोरमने पदवीधर शिक्षक संघाचे आमदार अरुण शहापूर यांच्याकडे केल्या आहेत.

सिटिझन्स कौन्सिलच्या सदस्यांनी आज शनिवारी सायंकाळी टिळकवाडी हायस्कूल येथे आमदार अरुण शहापूर यांची भेट घेतली आणि शाळा कधी सुरू कराव्यात? त्यासाठी कोणती काळजी घ्यावी? याबाबत सविस्तर चर्चा केली. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कौन्सिलने सर्वप्रथम हा विषय उचलून धरला आणि सातत्याने पाठपुरावा केला याबद्दल आमदार अरुण शहापूर यांनी सिटिझन्स कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर व त्यांच्या सहकारी सदस्यांचे अभिनंदन केले. तसेच कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, असे आश्‍वासन दिले.

Citizen council
Citizen council meets mlc shahapur

आमदार अरुण शहापूर यांना दिलेल्या निवेदनात कौन्सिलने नमूद केले आहे की, सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. सरकार आणि जिल्हा प्रशासन कोरोना नियंत्रणासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. लॉक डाऊननंतर आता कांही अंशी जीवनमान सुरळीत होत आहे. तथापि गेल्या पंधरा दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. त्यामुळे खबरदारीचा किंवा दक्षतेचा उपाय म्हणून शाळा सुरू करण्याबाबत आपण पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात मुले शाळेत सर्दी-पडसे असे आजार घेऊनच येतात. त्यात कोरोना प्रादुर्भावाला अजूनही पूर्णता आळा घातला गेला नसल्याने शाळा सुरू झाल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीत मुलांच्या आरोग्याशी आपल्याला खेळ करता येणार नाही, उलट त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही सर्वात प्रथम महत्त्वाची जबाबदारी आहे. तेंव्हा ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करण्याबाबत विचार करावा. त्याचप्रमाणे यावर्षी कोणत्याही शाळांनी पालकांना एकाच वेळी संपूर्ण प्रवेश फी भरण्याची सक्ती करू नये. सदर शैक्षणिक फीचे पैसे तीन हप्त्यात भरण्याची मुभा द्यावी. याखेरीज गणवेश आणि अन्य शैक्षणिक साहित्यासाठी पालकांवर दबाव आणला जाऊ नये आदी मागण्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.

 belgaum

आमदार अरुण शहापूर यांनी या सर्व मागण्या अत्यंत रास्त असून मुलांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या आहेत. आपण सरकारपर्यंत या मागण्या पोहोचवू आणि सरकारशी चर्चा करू. कोणत्याही परिस्थितीत मुलांचे आरोग्य महत्त्वाचे आहे या मुद्द्याशी आपण सहमत आहोत, असे पदवीधर शिक्षक संघाचे आमदार अरुण शहापूर यांनी कौन्सिलच्या सदस्यांना सांगितले. आमदारांच्या भेटीप्रसंगी सिटिझन्स कौन्सिल बेळगावचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्यासह शेवंतीलाल शाह, अरुण कुलकर्णी व ॲड. एन आर लातूर इतर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.