पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या सद्य परिस्थितीत जीवाची पर्वा न करता अखंड सेवा बजावणाऱ्या सफाई कामगारांबद्दल प्रशंसोद्गार काढले आहेत. पंतप्रधानांपासून प्रेरणा घेऊन हॉटेल राजेशाहीचे मालक मारुती सुतार आणि भाजप नेते किरण जाधव यांनी गुरुवारी महापालिका सफाई कामगारांना अल्पोपहाराचे वाटप केले.
माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनेनुसार आज गुरुवारी शहरातील स्वच्छता कामगारांचे आभार मानून त्यांची सेवा करण्याच्या उद्देशाने उपरोक्त उपक्रम राबविण्यात आला. कोरोना प्रादुर्भावाच्या या संकटकाळी शहरपरिसर स्वच्छ राहावा आणि पर्यायाने नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी बेळगाव महापालिकेचे सफाई कामगार रोज न चुकता स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता आपापल्या परिसराची स्वच्छता करत आहेत. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने आज हॉटेल राजेशाहीचे मालक व सामाजिक कार्यकर्ते मारुती सुतार यांनी सर्व सफाई कामगारांचे आभार मानले. त्याचप्रमाणे सुमारे 150 हुन अधिक सफाई कामगार व गरजू नागरिकांसाठी स्वखर्चाने अल्पाहाराची व्यवस्था केली होती.
याप्रसंगी भाजपा नेते किरण जाधव यांनी सर्व सफाई कामगारांचे विशेष आभार व्यक्त करत अल्पोपाहाराचे वाटप केले. कॉर्पोरेशन वॉर्ड सॅनिटेरिअन इंस्पेक्टर शीतल रामतीर्थ, मारुती सुतार, संतोष टक्केकर, वॉर्ड मुकादम मयूर जाधव, प्रमोद होनगेकर, जगनाथ धुडूम आदी यावेळी उपस्थित होते.