देशव्यापी लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर सध्या बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील किराणा दुकानदारांकडून नागरिकांची अक्षरशः लूट केली जात आहे. तेंव्हा प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे यांनी केली आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असून सर्वत्र संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा गैरफायदा शहरासह विशेष करून बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील किराणा दुकानदाराकडून घेतला जात आहे. या दुकानदारांकडून जीवनावश्यक वस्तूंसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत. बाजारात 35 रुपये किलो असणारी साखर 55 रुपयाला विकणे त्याचप्रमाणे इतर वस्तूचीही दुप्पट किंमतीने विक्री करून सध्या ग्रामीण भागातील किराणी दुकानदार ग्राहकांची लूट करत आहेत.
बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनताही सर्वसामान्य असून यापैकी बहुतांश मंडळी ही शेतकरी आणि हातावर पोट असणारे मजूर आणि कामगार आहेत. लॉक डाऊनमुळे रोजगार नसल्यामुळे मजूर व कामगारांचे खिसे रिकामे आहेत. शेतकऱ्यांची अवस्था ही बिकट आहे. शेती आणि अन्य कारणास्तव पैसे खर्च झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे नाहीत. अशा परिस्थितीत आता किराणा दुकानदारांकडून लूट केली जात असल्यामुळे शेतकरी व मोलमजुरी करणाऱ्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे.
बेळगाव तालुक्यातील किराणा दुकानदारांचा खुलेआम लुटमारीचा हा प्रकार जि. पं. सदस्य मोहन मोरे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. तसेच प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन किराणा दुकाने सरकारी यंत्रणेच्या नियंत्रणाखाली आणावीत. विशेषता ग्रामीण भागातील किराणा दुकानदारांच्या बाबतीत याची त्वरित अंमलबजावणी केल्यास जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे, असे जि. पं. सदस्य मोरे यांनी स्पष्ट केले आहे.आरोग्य आपत्ती काळात काम करणाऱ्या बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे देखील त्यांनी कौतुक केलं आहे अशीच कारवाई लॉक डाउन काळात दुप्पट किमतीत विकणाऱ्या दुकानदार वर करतील असेही ते म्हणाले.