मालकीहक्क असल्याचे सांगत 15 – 20 जणांच्या एका टोळक्याने घरात घुसून घरातील साहित्य बाहेर फेकून देण्याबरोबरच घरे पाडून जबरदस्तीने जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल रविवारी सायंकाळी बेळगाव – खानापूर महामार्गावरील पिरनवाडी गावानजीक घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पिरनवाडी गावानजीक बेळगाव – खानापूर महामार्गाशेजारी बाळू होळकर त्याच्या कुटुंबासह अन्य 2 – 3 गरीब कुटुंबांची घरे आहेत. गेल्या 40 वर्षांपासून ही कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास आहेत. तथापी काल रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आपल्यासोबत 15 – 20 लोकांना घेऊन आलेल्या नित्यानंद कुंदन्नावर नामक व्यक्तीने संबंधित घरांवर आपला मालकी हक्क सांगण्यास सुरुवात केली.
यावेळी घरातील पुरुष मंडळी कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे घरात फक्त महिलाच होत्या. या महिलांना धमकावून आलेल्या पंधरा-वीस जणांच्या टोळक्याने त्यांना जबरदस्तीने घराबाहेर काढले. त्याचप्रमाणे घरातील भांडीकुंडी आदी सर्व साहित्य घराबाहेर फेकून घराची पाडापाड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी होळकर कुटुंबियांसह अन्य कुटुंबातील लोकांनी त्यांना जोरदार विरोध केल्यामुळे त्यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला. नित्यानंद कुंदन्नावर आणि त्याच्या माणसांनी स्वतःसोबत जेसीबी देखील आणले होते असे समजते.
पिरनवाडी गावानजीक महामार्गाशेजारी असणाऱ्या संबंधित घरांमध्ये बाळू होळकर यांच्या कुटुंबासह अन्य दोन-तीन गरीब कुटुंबं गेल्या 40 वर्षांपासून वास्तव्यास आहेत. सदर घरांचा मालकी हक्क सांगणारी ग्रामपंचायतीची कागदपत्रे आपल्याकडे असल्याचे सुधा बाळू होळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच आपल्यावर अन्याय होत असून जबरदस्तीने आमच्या घरांचा ताबा घेण्याचा हा प्रकार त्वरित थांबवला जावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.