काकती परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या एका युवकाला काकती पोलिसांनी गजाआड केले असून त्याच्याकडील चोरीचा ऐवज जप्त केला आहे.
विनोद भावकाण्णा दिवटे (वय 36, रा. काकती) असे पोलिसांनी गजाआड केलेल्या चोरट्याचे नांव आहे. काकती येथील शारदा नागु चौगुले यांच्या घरी गेल्या 4 मार्च रोजी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून तिजोरीतील सोन्याचांदीचे दागिने लंपास करण्यात आले होते.
यासंदर्भात शारदा चौगुले यांनी दिलेल्या फिर्यादीचे दखल घेऊन काकती पोलिसांनी तीन दिवसात या प्रकरणाचा छडा लावताना विनोद दिवटे याला गजाआड केले.
तसेच त्याच्याकडील 12 ग्रॅम वजनाचे सोन्याची चेन, 5 ग्रॅमची कानातील सोन्याची साखळी आणि आणि चांदीचे दागिने असा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी काकती पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.