स्मार्टफोनच्या दुष्परिणामांबद्दल चर्चा आपण नेहमीच ऐकतो. मात्र आता याच स्पार्टफोनमुळे समाजामध्ये निसर्गाप्रती जिव्हाळा निर्माण झाला असून स्मार्टफोनने निसर्ग आणि मानवी समूहाला परस्परांशी जोडले आहे, ही मात्र अत्यंत स्वागतार्ह बाब आहे.
पूर्वी कोणत्याही क्षणांची आठवण ठेवण्यासाठी खासगी फोटोग्राफरला निमंत्रित केले जात असे. त्यांनी तयार केलेला अल्बम प्रत्येकाच्या संग्रहात असे, मात्र स्मार्टफोनमुळे आता प्रत्येकालाच फोटोग्राफर होण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. हातात असलेल्या स्मार्ट फोन घेऊन आपल्याला आवडतील ते क्षण किंवा निसर्ग टिपण्याचा छंद अनेक जण जोपासत आहेत. प्रामुख्याने निसर्गातील प्राणी, पक्षी, फुले, झाडे आदिंसह निसर्गाची अद्भुत किमया आपल्या फोनद्वारे टिपण्याचा छंद अनेक जण जोपासत आहेत. ही स्मार्टफोनची अत्यंत सकारात्मक बाजू म्हणावी लागेल. निसर्ग हा नेहमीच मानवाप्रती उपकारक ठरला आहे. आता स्मार्टफोनमुळे मानवी समूहाला सुद्धा निसर्गाचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळे निसर्ग आपल्या स्मार्टफोनमध्ये टिपतानाच निसर्गाला ओरबडणाऱ्या पर्यावरण घातक कृतींचे सुद्धा फोटो काढून व्हायरल होत आहेत. एकंदर निसर्गाची हानी रोखण्यासाठी सुद्धा स्मार्टफोन उपयुक्त ठरत आहे.
पर्यावरणप्रेमी आणि वाईल्डलाईफ फोटोग्राफर जयदीप सिद्दनावर यांच्या मते फोटोग्राफीसाठी ज्या व्यक्ती डीएसएलआर कॅमेराचा छंद म्हणून वापर करतात त्यांना निसर्ग नेहमीच मोहक दिसतो. परंतु आता फोटोग्राफीची उत्तम सोय असलेल्या स्पार्टफोनमुळे मोठा बदल झाला आहे. जे लोक निसर्गाचे महत्त्व जाणत नव्हते, ज्यांना निसर्गाच्या हानीशी देणेघेणे नव्हते, अशा लोकांमध्ये स्मार्टफोनमुळे निश्चितपणे परिवर्तन घडल्याचे दिसून येत आहे. आता अनेक लहानथोर मंडळी स्मार्टफोनद्वारे झाडे, फुलझाडे, रस्ते, नदी – नाले, तलाव, पक्षी आदींची छायाचित्रे काढत आहेत. थोडक्यात पूर्वी खर्चिक समजला जाणारा फोटोग्राफीचा छंद आता स्मार्टफोनमुळे खिशाला परवडेल असा झाला आहे. स्मार्टफोन हाताळणाऱ्या मंडळींची सतत निसर्गातील एखादे सुंदर दृश्य अथवा पर्यावरण हानीचे दृश्य टिपून ते सोशल मीडियावर पोस्ट करण्याची कृती पर्यावरण पूरक ठरत असल्याचेही जयदीप सिद्दनावर यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावर ‘सेलशॉट बेळगाव’ नावाचा ग्रुप चालवणारे मंदार कोल्हापुरे म्हणतात, आपल्या ग्रुपवर देशातील 27 हजार सदस्य आहेत. ‘सेलशाॅट पुणे’ असा ग्रुप सुद्धा ते चालवतात. मात्र बेळगावमध्ये स्मार्टफोनद्वारे फोटोग्राफी करणाऱ्यांची संख्या इतर शहरांच्या तुलनेत अधिक आहे. त्यांचे बहुसंख्य फोटो हे निसर्गालाच केंद्रीभूत करून काढलेले आहेत. अशा फोटोग्राफीला प्रोत्साहन म्हणून त्यांनी बेळगावमध्ये ‘सेलशॉट बेळगाव’ अंतर्गत उत्कृष्ट फोटोंसाठी बक्षीसेही जाहीर केली आहेत.
स्मार्टफोनमुळे लोकांना त्यांची निर्मिती क्षमता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे नेचर फोटोग्राफर संजय लगड म्हणतात. नेचर फोटोग्राफी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून निसर्गातील सौंदर्य टिपणे होय, अर्थात या छंदाला वेगवेगळे अन्य पैलू सुद्धा आहेत, असेही संजय लगड स्पष्ट करतात. एकंदर स्मार्टफोनमुळे सामान्य माणसे निसर्गाच्या जवळ जात आहेत, ही अत्यंत सकारात्मक बाब असून आपण त्याचे स्वागत केले पाहिजे, असाच सर्वांचा सूर आहे.