लखन जारकीहोळीने माझ्या पाठीत खंजीर खुपसला.माझ्या विरुद्ध षडयंत्र रचणाऱ्यांच्या करस्थानाला लखन बळी पडला याचे मला वाईट वाटते.आजपासून लखन पाच डिसेंबर पर्यंत माझा भाऊ नाही.पाच डिसेंबर नंतर पुन्हा तो माझा लहान भाऊ असेल असे उदगार रमेश जारकीहोळी यांनी काढले.भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच बेळगावला आलेल्या रमेश जारकीहोळी यांनी सांबरा विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला.
मला निवडणुकीत पराभूत करण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत .पण मला हरविणे कोणालाही शक्य नाही.देवाकडे मी प्रार्थना करतो की देवा लखनला माफ कर.माझे गुरू एच.विश्वनाथ असून काँग्रेसमधे सिद्धरामय्या हे मला ज्युनियर असेही रमेश जारकीहोळी म्हणाले.
सतीश जारकीहोळी पूर्वीपासून माझ्या विरोधात आहे.पण त्याच्यावर देखील माझा राग नाही.चाळीस वर्षांपासून मी आणि सतीश एकमेकांशी बोललो नाही.पण लखन नेहमी माझ्या सोबत होता.त्यामुळे त्यांच्या कृत्याचे मला वाईट वाटते असे रमेश जारकीहोळी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
रमेश जारकीहोळी हे संधीसाधू राजकारणी आहेत.त्यांच्या कृत्यामुळे काँग्रेसला सत्ता गमवावी लागली.केवळ बेळगाव जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्याचे नुकसान रमेशमुळे झाले आहे अशी प्रतिक्रिया सतीश जारकीहोळी यांनी लखन यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला या रमेश यांच्या विधानावर व्यक्त केली आहे.
रमेश सांगतील तसे ऐकले की चांगले आणि त्याच्या विरुद्ध वागले की वाईट अशी स्थिती आहे.गोकाकमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लखन निवडणूक लढवणार असून याविषयी काँग्रेसमधे कोणतेही मतभेद नाहीत.सिद्धरामय्या आपले गुरू नाही म्हणणाऱ्या रमेशनी यापूर्वी एस एम कृष्णा, जे एच पटेल आपले गुरू असे वक्तव्य केले होते.रमेश यांच्या गुरूंची यादी करायची झाली तर ती पन्नासहून अधिक व्यक्तीची आहे अशी टीका सतीश जारकीहोळी यांनी केली.