आपला देश कृषिप्रधान आहे हे फक्त म्हणायचे आणि शेतकऱ्याचीच मुस्कटदाबी करायची हे नेहमीचेच झाले आहे. आज बायपास विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्याच्या मागे कुणीच नाहीत ही वस्तुस्थिती आहे. रिंगरोड विरोधात एकत्र आलेले नेते आज या लढ्यापासून लांब का? त्यांनी बायपास विरोधी लढ्यातील शेतकऱ्यांना पाठबळ दिले पाहिजे पण हे नेतेही गायब असून शेतकरी एकाकी लढा लढत आहेत.
बेळगावच्या शेतकऱ्यांवर नेहमीच अन्याय झालेला आहे. वेगवेगळी कारणे दाखवून त्याची पिकावू जमीन हडप करण्याचे कारस्थान सुरूच असते. आता 200 फुटांच्या बायपास रोडसाठी बळजबरीने भूसंपादन करण्याची कामे सुरू आहेत. रोज विरोध करूनही शेतकरी अन्यायग्रस्त आहेत , कारण त्यांच्या पाठीमागे मोठी शक्ती नाही.
शहरात 80 फूट रस्ते करण्यास विरोध होतो, जास्तीत जास्त 100 फुटांचे रस्ते शहरात तयार होत असतात पण शहर बाहेरून जाणारा शेतवाडीतला रस्ता 200 फूट करण्याचे राजकारण काय हेच कळत नाही, विषय अवघड वाहतुकीचा असेल तर नापीक जमीन घेऊन हा रस्ता करता येऊ शकतो पण प्रशासनाला सुपीक जमीनच पाहिजे, असे का?
आज शेतकरी रोज लढत आहे, आपल्या शेताच्या बांधावर बसून रोज बुलडोझर अडवण्याचीही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, हाक दिली तरी नेते येत नाहीत, ज्यांना निवडून दिले आहे ते तर कधीच साथ देत नाहीत अशा अवस्थेतल्या शेतकऱ्याचा वाली कोण?
जमिनीचे सोडा, कणबर्गी येथे काय झाले? जनावरे धुण्यासाठी राखीव तलाव हे अधिकारी व राजकारणी सोडत नाहीत, हे असेच चालू राहिले आणि शेतकरी भडकला तर तो सत्ता उलथवून टाकायला कमी करणार नाही, नेत्यांनो तुम्हाला जर पुढे शेतकऱ्यांची साथ पाहिजे असेल तर आत्ता त्यांना साथ द्या, अन्यथा तुमचे काही खरे नाही.