Wednesday, April 24, 2024

/

भाषिक तेढ नेमकी कोणी, कशी आणि केंव्हा?

 belgaum

देशाकडे स्वतःचा वेगळा ध्वज मागून अडचणीत आलेले कर्नाटक सरकार बावचळले आहे. त्यात त्यांना कन्नड संघटना मदतीस धावून आल्या आणि एकूणच भाजप विरोधी लाट उसळविण्यात आलीये. यात सामान्य मराठी माणूस भरडतोय, कर्नाटकचा अनधिकृत ध्वज काढा म्हणणे यात भाषिक तेढ आली कुठे? मात्र या आरोपात बेळगावच्या आणि मराठीसाठी झगडणाऱ्या सूरज कणबरकर या युवकाला अडकविण्यात आलेय.

REd yellow flag

बेळगावात प्रादेशिक आयुक्त कार्यालयासमोर हा लाल पिवळा आणि कर्नाटकाला अभिमान वाटणारा ध्वज आहे. तसा तो सर्वत्रच लावला जातो. देशाचा तिरंगा दररोज फडकवून उतरविला जातो मात्र हा ध्वज सरकारी कचेरी समोर १२ महिने २४ तास फडकत असतो, हा संदर्भ घेऊन सूरज ने थेट केंद्रात राजनाथ सिंग नामक गृहमंत्री महोदयांकडे तक्रार केली. भारताचा एक नागरिक म्हणून तसे करण्याचा त्याला हक्क आहे. राजनाथ सिंगांच्या कार्यालयाने त्या तक्रारीची दखल घेऊन यावर योग्य ती कारवाई करा आणि कळवा असे पत्र कर्नाटकाच्या मुख्य सचिवांना केले, ही पार्श्वभूमी.

 belgaum

आता वास्तव काय, तर त्या सूरज कणबरकर ने तक्रार केली आणि त्याची दखल घेतली गेली म्हणून त्याचा भाषिक तेढ निर्माण झाली असा अर्थ काढून त्याच सूरज वर कर्नाटक आपल्या बेळगाव जिल्ह्यातल्या बेळगाव शहरातील मार्केट पोलिसात दोन भाषिक गटात तेढ निर्माण केल्याचा आरोप ठेवते, हे वास्तव भयानक नाही का? केंद्र आणि महाराष्ट्र याकडे डोळेझाक करणार का? आणि आरोप झाला तर ठीक मात्र ही तेढ की काय निर्माण तरी झाली की नाही याची शहानिशाही करण्याची गरज गुन्हा दाखल करून घेणाऱ्या पोलिसांना का वाटली नाही? की आवाज दडपण्यासाठी सारेकाही ठरवून सुरू आहे? इतरवेळी तक्रार आणि फिर्याद घेण्यास अ ळ म ट ळ म करणारे पोलीस इतक्या लवकर कार्यक्षम कसे झाले?

सूरज कणबरकर याने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन किंवा पडसाद उठून कुठे जाळपोळ झाली की कन्नड आणि मराठी भाषिक गट एकमेकात भिडले? तसेही काही झालेले नाही. मग हा गुन्हा त्या पोलिसांनी कोणत्या आधारावर दाखल केलाय? हे प्रश्न विचारायचे कोणी? हा सुद्धा प्रश्न आहे. जाळपोळ मारामारी होईल अशी शक्यता गृहीत धरून हा गुन्हा दाखल केला असा युक्तिवाद मात्र केला जाईल यात वाद नाही.

बेळगाव ही कन्नड आणि मराठी वादाची भट्टी कधीच नाही. इथे भाषिक वाद कधीच नव्हता आणि नाही. सीमाप्रश्नाची पहिली ठिणगी चेतवणारे तरुण भारत कार स्वर्गीय बाबुराव ठाकूर यांनी मराठी शाळा काढल्या होत्या मात्र ज्या भागात तुरळक कन्नड भाषिक होते त्यांच्यासाठी त्यांनी कन्नड शाळाही काढल्या होत्या. आजही येथे अनेक मराठी उद्योजक व्यापाऱ्यांकडे कन्नड माणूस त्याच सन्मानाने नोकरी करतो, जय महाराष्ट्र म्हणून कर्नाटकी पोलिसांनी कितीही काठ्या पाठीवर फोडल्या तरी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांसाठी आजही मराठी माणूस छातीची ढाल करून उभा राहतो, त्याचा सत्कार करतो. चांगले ते चांगले त्यात कन्नड मराठी आणण्याची मराठी दुराभिमानी भावना मराठी माणसाच्या मनात कधीच येत नाही, म्हणूनच अनेक विवाहही कन्नड मराठी घरात होतात, मी जय महाराष्ट्र पण बायको जय कर्नाटक आहे असे विनोद करीत भाषिक वादा ला थारा न देता इथला माणूस जगत आला आहे.

आम्ही महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्रात जाणार ही भावना मात्र कायम आहे. कर्नाटकाने या भावनेला नेहमीच भाषिक वादाचे स्वरूप देण्याचा अट्टाहास सुरू केला आहे. कर्नाटक सरकार आणि कर्नाटक रक्षणाची धुरा सांभाळणारे नेहमीच मराठी माणूस आणि भाषेचा दुस्वास करत आलेत, मराठी माणूस कानडी भाषेशी आणि भाषिकाशी प्रेमाने वागत असला तरी कन्नड दुराभिमानी मंडळींना हे अजून ध्यानात येत नाही. सीमाभागातील मराठी माणूस कन्नड विरोधी आहे हे त्यांनी ठासून सांगण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे, म्हणूनच असे सूरज कणबरकर सारखे तरुण चुकीच्या आणि आकसाने केलेल्या गुन्ह्यात अडकवविले जातात.

कर्नाटकाला विरोध का तर तेथे डांबले म्हणून, सक्ती केली म्हणून कन्नड शिकायला विरोध आहे, एक ध्वज एक देश या राष्ट्रीय एकात्मतेला समर्थन म्हणून लाल पिवळ्या कर्नाटकी ध्वजाला विरोध आहे.हे कर्नाटकाला माहीत नाही असे नाही, मात्र त्यांना तसे दाखवायचे नाही, म्हणूनच देश पातळीवर बदनामीचे कट शिजतात. महाराष्ट्रात जातो म्हणणाऱ्या मराठी माणसाला कर्नाटकचे अन्न खाता असे हिणवले जाते. एकात्मतेचे धडे शिकवले जातात, आपण केलेल्या अनधिकृत कृत्यांना कर्नाटक झाकून ठेवते.

१९५६ पासून हेच चालत आले आहे. ज्यांनी हा प्रश्न निर्माण केला आणि घोंगडे भिजत ठेवले त्या सर्वांनाच याचे पाप लागणार आहे. सूरज कणबरकर ने तक्रार केली तर ती दोन भाषिक गटात तेढ होत असेल तर राष्ट्रीय एकात्मता भंग करणाऱ्या, स्वतंत्र ध्वजाची परवानगी मागणाऱ्या आणि परवानगी नसतानाही असा ध्वज खुलेआम फडकवून त्यावर तक्रारही करण्याचा लोकशाहीने दिलेला अधिकार हिरावून घेणाऱ्या कर्नाटक सरकारवर कोणता गुन्हा दाखल करावा ते आता ते केंद्र आणि महाराष्ट्राचे सरकारच जाणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.