बेळगावात भ्रष्टाचार निर्मुलन परिवार म्हणून एक संस्था आहे या संस्थेने मंगळवारी एक आंदोलन केले. पत्रकारिताआणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळाघोट घेणाऱ्या सरकार विरोधात हे आंदोलन झाले. कर्नाटक सरकारच्या हक्कभंग समितीने सध्या प्रसिद्ध साप्ताहिक हाय बंगळूरू चे संपादक रवी बेळगेरे आणि एलहंका व्हॉइस चे जेष्ठ पत्रकार यांच्या वर एक वर्षाचा कारावास आणि १०,००० रुपये दंडाची कारवाई केली आहे. कर्नाटकात याचे पडसाद तीव्रतेने उमटलेले दिसतात. या निषेधार्थ बेळगावातील पत्रकार आणि विविध सामाजिक संघटनांनी निदर्शन केली.
हे प्रकरण नेमके काय आहे याचा आढावा बेळगाव live ने यापूर्वीच घेतलाय. दोन आमदारांनी केलेल्या तक्रारी वर ही कारवाई झाली हे सगळ्यांना माहीत आहे. आपली प्रकरणे उघडकीस आली म्हणून ती आणणाऱ्या माध्यमाच्या संपादकांना आकस बुद्धीने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे आणि सरकारने त्यांना कारवाई करून धडा शिकवणे हे कुठल्या लोकशाहीत बसते ते त्यांनाच ठाऊक.
मागे बेळगावच्या तरुण भारताचे संपादक किरण ठाकूर यांनाही याच परिस्थितीचा सामना करायला लागला. दोन आमदारांनी हक्कभंग समितीकडे तक्रार केली आणि किरण ठाकूर यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले. त्यांनीही शेवट पर्यंत आपला बाणा सोडला नाही. ठाकूर तर किमान त्या समितीसमोर हजर झाले आणि विधानसभेत इंग्रजीत बोलून त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यांच्या प्रमाणेच लढाऊ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रवी बेळगेरे यांनी तेही केले नाही. आपण अशा प्रकाराला किंमतच देत नाही असे ते सांगतात. प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागायची तयारी त्यांची आहे.
महाराष्ट्रातही अमरावती पोलिसांकडून पत्रकार प्रशांत कांबळे आणि अभिजित तिवारी या दोघा पत्रकारांना असेच अटक करण्यात आले आहे. ज्या भाजप सरकारने प्रशांत ला पुरस्कार दिला तेच सरकार हातात बेड्याही ठोकते आणि त्याचे कारण चुकीचे कृत्य करणाऱ्या विरोधात आवाज उठविला हेच असेल तर ही ठोकशाही झाली. प्रशांत ने भ्रष्ट अधिकाऱ्यां विरोधात बातम्या केल्या स्टिंग केली म्हणून सूद बुद्धीने पोलिसांनी मारहाण करत सराईत गुन्हेगार सारखी वागणूक दिली अशा सरकारांना पायउतार करण्यासाठी आणि पत्रकारितेला बळ देण्यासाठी समाजाच्या आंदोलनांची गरज आहे. नाहीतर काळ सोकावेल आणि कुणीही कितीही पापे केली तरी ती उघड करण्याचे बळ शिल्लक उरणार नाही.
पत्रकारिता या माध्यमाच्या रक्षणाची गरज आहे. किरण ठाकूर, रवी बेळगेरे, गिरीश कुबेर सारख्या यंत्रणेविरुद्ध आवाज उठवणार्या संपादकांची आणि अमरावतीचे पत्रकार प्रशांत कांबळे सारख्या लढाऊ पत्रकारांची गरज आहे. समाजाची अधोगती रोखण्यासाठी धारदार लेखणी टिकली पाहिजे, अन्यथा जे होईल ते आराजकतेपेक्षा वाईट असेल, म्हणूनच ही आंदोलने स्तुत्य आहेत