Saturday, December 7, 2024
 belgaum

चैत्राचं आगमन झालं आणि मराठी नववर्षाची सुरवात झाली.बघता बघता चैत्र संपुन वैशाखाचं आगमन होतंय..वैशाख हा भारतीय कालगणनेत वर्षातील दुसरा महिना. वसंत ऋतुच्या उत्साही आणि प्रसन्न वातावरणात याचं आगमन असतं. शाळेला सुट्टी असल्यामुळे वैशाखाची ऊन्हं सुद्धा सुसह्य होतात.वर्षभर वाट पाहून मिळालेली ही सुट्टी म्हणजे सगे सोयरे आणि मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवायचा.चिंचेची जीगळी,कैरीचं ताजं लोणचं,करवंद,चुरणं,धामणं,जांभळं,आंबा,फणस खायची चढाओढ असते. मे महिन्याची सुट्टी म्हणजे आनंदी आनंद.चैत्र-वैशाख म्हणजे वसंत ऋतू , ..शिशिरातली पानगळ संपल्यावर झाडाना नवी पालवी येते ती वसंत ऋतुतच.वसंत म्हणजे ऋतूंचा राजा!चैत्र नवी कोवळी पालवी दिसू लागते, कोवळी पाने दिसू लागतात तर वैशाखात मोहोर-कळ्या दिसू
लागतात आणि फुलेहि फुलायची सुरवात होते.गुलमोहराची झाडं भगव्या,लाल फुलांची उधळण करतातच.बहावाची पिवळी फुलं आणि जॅकारॅडाची जांभळी फुल जागोजागी बहरलेली दिसतात.
अक्षय तृतीया हा वैशाखशुद्ध तृतीयेला साजरा होणारा एक मोठा सण.
अक्षय तृतीया या दिवशी जे काही जप, होम, पितृतर्पण, दान इत्यादी केले जाते ते अक्षय होते, असा शास्त्रसंकेत आहे..
हिंदू संस्कृतीत जे साडेतीन मुहूर्त पाळतात त्यातील ‘अक्षयतृतीया’ हा अर्धा मुहुर्ताचा दिवस..
अक्षयतृतीया हा
सासुरवाशीणींचा सण! बेळगावात अक्षय तृतीया ईतकी जोरात नसते जीतकी ती खानदेशात असते.माझी कन्या खानदेशात असते.तीथे
खान्देशात घरोघरी अक्षय्यघट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते. त्याच्यावर छोटं मातीचच भांडं ठेउन त्यावरती खरबुज आणि दोन सांजोर्‍या, दोन आंबे ठेवतात. छोटं भांडं पितरांसाठी. आधी त्यांना पाण्याचा घट देउन मग नविन माठ वापरण्यात येतो. दुपारी चुलीवर/ आता गॅसवरच ‘घास’ टाकतात. आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई असा जबरदस्त बेत असतो.याच दिवसापासून आंबे खायला सुरवात करतात. हा सासुरवाशिणींचाही सण आहे. सासरी गेलेल्या लेकींना वर्षातुन दोनदाच माहेरी जायला मिळतं. दिवाळी आणि आखाजी. दिवाळी घाई गडबडीत देणं घेणं करण्यात जाते. आखाजी म्हण्जे विसाव्याचा सण. सासरच्या घबडग्यातुन, कामाच्या रट्ट्यातुन तेवढाच आराम. त्यामुळे त्या या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. सासुरवाशिणीना गौराई असं म्हटलं जातं. आणि जावयाला शंकरजी!
माहेरी या सासुरवाशिणीचं कित्ती कोडकौतुक. आमरस,पुरणपोळीचं गोड जेवण, पुडाच्या पाटोड्या आणि काय काय…! दुपारच्या जेवणानंतर शेजारपाजारच्या सख्या भेटायला येतात. आंब्याच्या झाडाखाली पथार्‍या टाकल्या जातात..गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरु होते.
सूर्याच्या तेजाने सृष्टी तापून निघत असते. अश्यावेळी थंडगार पाण्यासाठी जीव व्याकुळ होत असतो.

पण आमरस आणि माहेरची माणसं ह्यात ही व्याकुळता जाणवतच नाही.
अक्षय तृतीयेबरोबरच वैशाख महिन्यात येणारे इतर महत्वाचे दिवसही आहेत.

*परशुराम जयंती* : वैशाख शुद्ध द्वितीया, परशुराम जयंती नावाने ओळखली जाते. या दिवशी महापराक्रमी वीर परशुराम यांचा जन्म झाला. परशुराम हे विष्णू देवांच्या दशावतारातील सहावा अवतार होय.

त्यांच्या आईचे नाव रेणुका व वडिलांचे नाव जमदग्नी असे होते.

*गुरुनानक जयंती* : वैशाख शुद्ध तृतीयेला शीख पंथाचे आद्य संस्थापक गुरुनानक यांचा जन्म लाहोर नजीक तलावंडी येथे झाला. त्यांच्या आईचे नाव तृप्ता व वडिलांचे मूळ नाव काळू असे होते. त्यांच्या पत्नीचे नाव सुलक्षणी असे असून तिला जयचंद व श्रीचंद असे दोन पुत्र होते. त्यांचा गुरुग्रंथ साहेब हा ग्रंथ शिखांचा पवित्र ग्रंथ आहे. त्यामुळे शीख बांधव हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात.

*नरसिंग जयंती* : वैशाख शुद्ध चतुर्दशीला नरसिंग जयंती साजरी केली जाते. नरसिंग हा दशावतारातील चौथा अवतार होय. त्याने हिरण्यकश्पुला ठार मारले. प्रल्हादाचे संरक्षण केले. विष्णूभक्त हा दिवस पवित्र मानतात.

*बुद्ध जयंती* : वैशाख शुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्ध जयंती साजरी केली जाते.

आर्टिकल सौजन्य- लालन प्रभु

 

 

 

Vaishakh

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.