बेळगाव दि २० : काल तारखेनुसार शिवजयंती होती. प्रशासनाने ती साजरी करण्याचा आटापिटा केला. शिवाजी उद्यांनातल्या या सरकारी कार्यक्रमाला नागरिकांनी पाठ फिरवली. सायंकाळी तर या सरकारी आयोजकानी कमालच केली ती शिवजयंतीला लावणी ठेऊन. लावणी हा ही मराठी परंपरेतील एक नृत्यप्रकार आहे हे मान्य पण तो शिवजयंतीला चालत नाही, शिवजयंतीला पोवाडा च लागतो याचे ज्ञान नसलेल्या मंडळींना कोण सांगणार?
बेळगावच्या मराठी माणसाला आपल्याकडे झुकविण्यासाठी सरकार असली थेरं करू लागले आहे. शिवजयंती हा त्यातलाच एक भाग पण त्यात लोकसहभाग नसल्याने मागील काही वर्षांपासून त्याचा फज्जा उडू लागला आहे. बाहेरची कला पथके मागवून नसते उपद्व्याप करण्यापलीकडे या कार्यक्रमाला दुसरे कोणतेही मराठमोळे स्वरूप येईनासे झाले आहे.
या सरकारी कार्यक्रमात नियोजन नाही, स्थानिक शिवभक्तांन्ना सामावून घेणे नाही यामुळे केवळ एक उपचार किंवा औपचारिकता यापलीकडे काय साध्य झाल्याचे दिसत नाही. बेळगावची शिवजयंती दरवर्षी तिथी नुसार साजरी होते, त्यात बेळगावात शिवराई अवतरते, पुढील महिन्यात तो तीन दिवशीय सोहळा होईलच. शिवरायांप्रतीचा आदर व्यक्त करताना बेळगावकर मुंबई पुणे करांपेक्षा पुढे आहेत. मग बेंगरुळकरांकडून काय अपेक्षा ठेवणार?