belgaum

बेळगाव अधिवेशनाच्या खर्चावर आरटीआय कार्यकर्त्यांकडून चौकशीची मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावातील हिवाळी अधिवेशनाच्या आयोजनासाठी करण्यात येणाऱ्या खर्चात आर्थिक अनियमितता होत असल्याचा संशय व्यक्त करत माहिती अधिकार कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी संबंधित खर्चाची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे. टेंट उभारणी, सीसीटीव्ही यंत्रणा भाड्याने घेणे आणि व्हीआयपी निवास व्यवस्थेवर होणाऱ्या खर्चाबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

२०२४ मध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी जर्मन टेंट उभारण्याकरिता तब्बल ४ कोटी ७४ लाख रुपये खर्च झाल्याचा दावा गडाद यांनी केला. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे भाड्याने घेण्यासाठीही मोठी रक्कम खर्च केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शहरातील प्रतिष्ठित हॉटेल्समध्ये २५५ व्हीआयपी खोल्या आरक्षित करण्यात आल्या असून, सुरक्षेच्या कारणास्तव या खोल्यांमध्ये कोण वास्तव्यास आहे, याची माहिती सार्वजनिक केली जात नसल्याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवला. मंत्री, आमदारांचे समर्थक तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सरकारी खर्चातून निवास सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 belgaum

या संदर्भात आवश्यक कागदपत्रांसह दोन्ही सभागृहांच्या पीठासीन अधिकाऱ्यांकडे निवेदन पाठवून खर्चाच्या प्रत्येक बाबीची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

खोल्या कोणत्या निकषांवर दिल्या जातात, सीसीटीव्ही यंत्रणेच्या भाड्याचे दर काय आहेत आणि वारंवार भाड्याने कॅमेरे घेण्याऐवजी कायमस्वरूपी यंत्रणा उभारणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल का, याची पडताळणी व्हावी, असे गडाद यांनी म्हटले आहे.

या तक्रारीची दखल घेऊन चौकशी सुरू न केल्यास लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यासह न्यायालयीन मार्ग अवलंबणार असल्याचे भीमाप्पा गडाद यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.