बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेने मालमत्ता कर भरण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी तीन नवीन नागरिकस्नेही डिजिटल सुविधा सुरू केल्या आहेत. बल्क एसएमएस, व्हॉट्सॲप चॅटबॉट आणि भारत बिल पेमेंट सिस्टीम (BBPS) या सुविधांच्या माध्यमातून नागरिकांना आता घरबसल्या मोबाईलवरून मालमत्ता कर भरता येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी दिली.
महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या नवीन सुविधांची माहिती दिली. कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विशेष सॉफ्टवेअरची व्यवस्था करण्यात आली असून, त्याद्वारे नागरिकांना तीन डिजिटल सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
महानगरपालिका क्षेत्रात एकूण १ लाख ७१ हजार मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांना बल्क एसएमएसद्वारे करासंदर्भातील माहिती पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या मालमत्तेवरील थकीत कराची माहिती मिळवून तो भरता येईल.
व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे मिळणार कराची माहिती
महापालिकेने 7090022888 हा व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून यापूर्वी भरलेला कर, थकीत कर आणि चालू वर्षात भरावयाच्या कराची माहिती मिळणार आहे. थकीत कर भरल्यानंतरच चालू वर्षाचा कर भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

गुगल पे, फोन पे आणि पेटीएमद्वारे कर भरण्याची सुविधा
BBPS सुविधेच्या माध्यमातून नागरिकांना पेटीएम, गुगल पे आणि फोन पे यांसारख्या डिजिटल पेमेंट ॲपद्वारे मालमत्ता कर भरता येणार आहे.
या सुविधांमुळे नागरिकांना महापालिकेच्या उत्तर, दक्षिण, मध्य, बेळगाव-१ किंवा संगणक केंद्रांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. घर, व्यावसायिक आणि औद्योगिक मालमत्तांचा कर मोबाईलवरूनच भरता येणार असून, करासंबंधी आवश्यक माहितीही मिळवता येणार आहे.
नागरिकांचा वेळ वाचविण्यासोबतच वेळेत कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. शहरातील विकासकामे नागरिकांकडून जमा होणाऱ्या करावर अवलंबून असल्याने सर्वांनी या डिजिटल सुविधांचा लाभ घेऊन वेळेत कर भरावा आणि शहराच्या विकासाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त कार्तिक एम. यांनी केले.
यावेळी महसूल विभागाचे उपायुक्त डॉ. सिद्धू हुल्लोळी, विकास विभागाच्या उपायुक्त लक्ष्मी निप्पाणिकर आदी उपस्थित होते.




