बेळगाव : दसरा, दिवाळी आणि छठ सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण पश्चिम रेल्वेकडून यशवंतपूर–पंढरपूर दरम्यान साप्ताहिक एक्स्प्रेस विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे. दोन्ही दिशेने प्रत्येकी आठ फेऱ्या होणार आहेत.
गाडी क्रमांक 06507 यशवंतपूर–पंढरपूर विशेष एक्स्प्रेस दर बुधवारी सायंकाळी 6.15 वाजता यशवंतपूरहून सुटेल. ही सेवा 7 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2026 दरम्यान चालणार असून, दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी 11.35 वाजता पंढरपूरला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 06508 पंढरपूर–यशवंतपूर विशेष एक्स्प्रेस दर गुरुवारी दुपारी 1.35 वाजता पंढरपूरहून सुटेल. 8 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर 2026 दरम्यान ही सेवा उपलब्ध राहणार असून, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहाटे 4.15 वाजता यशवंतपूरला पोहोचेल.
या विशेष रेल्वेला तुमकूर, अरसीकेरे, बिरूर, चिकजाजूर, दावणगेरे, हरिहर, एस.एम.एम. हावेरी, एस.एस.एस. हुबळी, धारवाड, लोंढा, बेळगाव, गोकाक रोड, घटप्रभा, रायबाग, मिरज, आरग, कवठेमहांकाळ, ढालगाव, जाथ रोड आणि सांगोला या स्थानकांवर दोन्ही दिशांनी थांबे असतील.
विशेष रेल्वेत एकूण 21 डबे असतील. यामध्ये 2 एसी-2 टियर, 6 एसी-3 टियर, 7 स्लीपर क्लास, 4 जनरल सेकंड क्लास तसेच 2 लगेज-कम-ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कार यांचा समावेश आहे.
सणासुदीच्या काळातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी ही विशेष सेवा महत्त्वाची ठरणार आहे.





