belgaum

आयुक्त बदलला… पण पदभार नाही? गणेशोत्सवामुळे निर्णय लांबणीवर?

0
 belgaum

बेळगाव : राज्य शासनाने जारी केलेल्या बदली आदेशानुसार बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची धारवाड पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी प्रकाश निकम यांची बेळगावच्या नव्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शासकीय आदेशानुसार प्रकाश निकम रविवारी बेळगाव पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, रविवारी रात्री उशिरापर्यंत त्यांनी पदभार स्वीकारलेला नसल्याने पोलीस वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भूषण बोरसे यांची बदली गणेशोत्सव संपेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे का? तसेच गणेशोत्सवाचा बंदोबस्त आणि विसर्जन मिरवणूक पूर्ण झाल्यानंतरच ते धारवाडला रवाना होणार का, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.

 belgaum

गणेशोत्सवाच्या बंदोबस्ताची मोठी जबाबदारी

बेळगावमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेषतः गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडणे हे पोलीस प्रशासनासमोरील मोठे आव्हान असते. यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो.

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पदावर असताना गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत बंदोबस्त आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक नियोजन केले आहे. त्यामुळे गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा अनुभव आणि नियोजनाचा उपयोग करून घेतला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भूषण बोरसे धारवाडमध्ये कधी रुजू होणार आणि प्रकाश निकम बेळगाव पोलीस आयुक्तपदाचा पदभार नेमका कधी स्वीकारणार, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या बदलीच्या या प्रक्रियेबाबतचा सस्पेन्स कायम असून, पुढील काही दिवसांत याबाबत अधिकृत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.