बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सीमाप्रश्नी तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे.
शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात, १९५६ च्या भाषावार प्रांतरचनेत बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आणि ८६५ मराठी भाषिक गावे अन्यायाने तत्कालीन म्हैसूर (आजचे कर्नाटक) राज्यात समाविष्ट केल्याचे नमूद केले आहे. सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात जलद सुनावणी घडवून आणून सीमाभागातील मराठी बांधवांना न्याय मिळवून द्यावा, अशी मुख्य मागणी करण्यात आली.
या संदर्भात राज्य सरकारच्या विधी पथकाने तातडीने ‘अर्जंट लिस्टिंग’साठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. तसेच केंद्र सरकारकडे प्रभावी पाठपुरावा करून सीमाभागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळेपर्यंत मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. याशिवाय उच्चस्तरीय समन्वय समितीची स्थापना करून वरिष्ठ विधिज्ञांच्या टीमने कोर्टात आक्रमक बाजू मांडावी, यासाठी विशेष आढावा बैठक घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या शिष्टमंडळात रमाकांत कोंडूस्कर, गुणवंत पाटील, सागर पाटील आणि कपिल भोसले मोतेश बारदेशकर,विनायक बिरजे,विराज मुरकुंबी,नंदू इंदुलकर निलेश मुतगेकर यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांचा समावेश होता.
कुपवाड दुहेरी हत्याकांडातील आरोपीला फाशी द्या; समस्त मराठा समाज बेळगावची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
: सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे झालेल्या केसरेकर दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देत फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, तसेच अनाथ झालेल्या मुलांना शासकीय मदत आणि कायदेशीर संरक्षण द्यावे, अशी मागणी समस्त मराठा समाज बेळगावच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
या मागणीसाठी शिष्टमंडळाने सोमवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन साद केले.
बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हेब्बाळ गावचे मूळ रहिवासी असलेले मोहन नागाप्पा केसरेकर (४५) आणि त्यांच्या पत्नी मनीषा मोहन केसरेकर (३५) हे उपजीविकेसाठी सांगलीतील कुपवाड एमआयडीसी परिसरात वास्तव्यास होते. १५ ऑगस्ट २०२६ रोजी कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून शेजारी राहणाऱ्या फरीद शेख याने चाकू आणि हातोड्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनीषा आणि मोहन केसरेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांची दोन लहान मुले मनाली आणि मनोज अनाथ झाली आहेत.
या घटनेचा निषेध करत समस्त मराठा समाज बेळगावच्या शिष्टमंडळाने आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. संवेदनशील प्रकरण लक्षात घेता विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, खटला फास्ट-ट्रॅक न्यायालयात चालवावा आणि कायद्यानुसार आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
तसेच, प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवून लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

अनाथ मुलांच्या भवितव्याबाबतही मागण्या
आई-वडिलांच्या निधनामुळे अनाथ झालेल्या मनाली आणि मनोज या दोन्ही मुलांचे पालकत्व राज्य सरकारने स्वीकारावे, तसेच प्रत्येक मुलाला दरमहा १० हजार रुपयांची आर्थिक मदत सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत शासनाने लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली.दरम्यान, या प्रकरणातील मुख्य फिर्यादी मनाली, तिचा भाऊ मनोज आणि इतर प्रमुख साक्षीदारांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. त्यांना शासकीय खर्चाने तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले.या दुःखद घटनेत केसरेकर कुटुंबाच्या पाठीशी संपूर्ण समाज खंबीरपणे उभा असल्याचेही यावेळी शिष्टमंडळाने स्पष्ट केले.





